सुट्टीनंतर कोकणातून परतणाऱ्या पर्यटक-कोकणवासीयांची रखडपट्टी; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप
सलीम शेख
माणगाव : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या चार दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विशेषतः माणगाव बाजारपेठेत तर गाड्यांचा अक्षरशः खच पडला. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, गोपाळकाला आणि रविवार या सलग सुट्ट्यांचा आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या हजारो पर्यटक आणि कोकणवासीयांचा प्रवास अक्षरशः त्रासदायक ठरला. तासन्तास रस्त्यावर अडकून पडलेल्या प्रवाशांचा उत्साह नाहीसा होऊन त्रास, संताप आणि नाईलाज यांचा उद्रेक झाला.
मुसळधार पावसात वाहनात अडकून पडलेले, अन्नाविना त्रस्त झालेले प्रवासी पाहून प्रशासनाचे उदासीन धोरण ठळकपणे समोर आले. तासनतास महामार्गावर गाड्या रेंगाळल्याने प्रवाशांची अवस्था दयनीय झाली होती.
महामार्गाचे काम तसेच माणगाव व इंदापूर येथील बायपासचे काम वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. गाजावाज्यात दिलेली आश्वासने ढगांतील विजेसारखी ठरली. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही जनतेला मिळालेला रस्ता अपूर्ण व खडबडीतच. परिणामी अपघातांची शक्यता, रुग्णवाहिका अडथळ्यात अडकणे आणि जीव धोक्यात येणे हे नेहमीचेच झाले आहे.
दरवर्षी सणासुदीच्या काळात कोंडी होणार हे ठरलेले असतानाही ठोस उपाययोजना होत नाहीत. शासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होत असून जनतेत तीव्र रोष आहे. “विकास”च्या नावाखाली केवळ फसवणूक झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
मुंबई–गोवा महामार्गाचे काम तब्बल सतरा वर्षांपासून सुरू असूनही अद्याप अपूर्ण आहे. विशेषतः माणगाव व इंदापूर बायपासचा अभाव हीच कोंडीची मुख्य कारणे आहेत. तासन्तास लागणाऱ्या वाहनरांगा आणि प्रचंड विलंबामुळे प्रवाशांचा संताप शिगेला पोहोचला आहे. स्थानिक नागरिकांनी इशारा दिला आहे की, महामार्गाचे काम तातडीने पूर्ण झाले नाही, तर संतापाचा ज्वालामुखी फुटल्याशिवाय राहणार नाही.
