रायगड : मुंबई व कोकण पट्ट्यात सोमवारीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसह शेजारील जिल्ह्यांना मंगळवारी (१९ ऑगस्ट २०२५) मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पालघर, पनवेल आणि रायगड या भागातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनांनी घेतला आहे.

रायगड जिल्ह्यात सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. कुंडलिका, अंबा आणि सावित्री नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक सखल भागांत पाणी शिरले आहे. भारतीय हवामान खात्याने जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे, या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सुट्टी देण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे पत्रक जारी केले आहे.
