घन:श्याम कडू
उरण : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उरण–पनवेल राष्ट्रीय महामार्ग अक्षरशः तळे बनला आहे. गुडघाभर पाणी साचल्याने दहा मिनिटांचा प्रवास करण्यासाठी नागरिकांना तब्बल तीन ते चार तासांचा त्रास सहन करावा लागला. आधीच दररोजच्या वाहतूक कोंडीने होरपळणाऱ्या उरणकरांच्या संतापाचा आज कडेलोट झाला.
गणेशोत्सव जवळ आल्याने भाविक खरेदीसाठी मुंबई–पनवेलकडे निघाले होते; मात्र महामार्गावर उभ्या पाण्यामुळे गाड्यांच्या रांगा मैलोनमैल लांबल्या. प्रवास छळछावणी ठरला. दररोज टोल वसूल करूनही दोन पावसांतच रस्ते पोखरले. खड्ड्यांमुळे नागरिक बळी पडतात, अपघात होतात; पण जबाबदारी उचलण्याऐवजी उलट पीडितांवरच गुन्हे दाखल होतात, अशी जनतेची तीव्र नाराजी आहे.
रस्ते व उड्डाणपूल उभारणीचे जनक म्हणून नावाजलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विकास मॉडेलची पोलखोल उरण–पनवेल हायवेवर झाली आहे. जलमय रस्त्यावर गाड्या अडकल्या, प्रवाशांचा श्वास गुदमरला आणि जनता संतप्त झाली. “हा विकास की अधोगती? धनदांडग्यांच्या सुखसोयींसाठी महामार्ग की सामान्यांसाठी त्रास?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शासन, ठेकेदार आणि नेतेमंडळींनी मौन धारण केले असले तरी “गडकरींनो, हाच का तुमचा विकास?” असा थेट प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे.
