पोलिसांना पाण्यात उभं राहून कर्तव्य बजावण्याची वेळ
घनश्याम कडू
उरण : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक, दुकानदार आणि प्रवाशांसह पोलिसांनाही मोठा फटका बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे न्हावा-शेवा पोलीस ठाण्यातच पावसाचे पाणी शिरले असून पोलिसांना पाण्यात उभं राहून कर्तव्य बजावण्याची वेळ आली आहे.
यंदा दुसऱ्यांदा घडलेल्या या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या इमारतीची दयनीय अवस्था स्पष्ट झाली आहे. जुनी झालेली इमारत, आजूबाजूच्या विकासकामांतील अतिरेकी भराव आणि बंद झालेले नाले यामुळे ठाण्याचा परिसर दलदल स्वरूपाचा झाला आहे. परिणामी पावसाचे पाणी थेट ठाण्यात घुसत असून कर्मचारी वर्गाची प्रचंड तारांबळ उडत आहे.
दरम्यान, ठिकठिकाणी उभी असलेली मोठमोठी झाडे पाण्यात निथळत असल्याने ती कोसळण्याचा धोका वाढला आहे. ही झाडे पडल्यास थेट जीवितासह मालमत्तेचेही मोठे नुकसान होऊ शकते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास तत्पर असणारे रक्षकच आज स्वतः असुरक्षित झाले आहेत, हीच खरी शोकांतिका असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
“आपलं रक्षण करणारेच जर पाण्यात उभे असतील, तर प्रशासन कुठं आहे? पोलीस ठाण्याचा परिसर सुरक्षित करण्यासाठी विशेष पथक पाठवावं लागणार का?” असा सवाल उपस्थित होत असून स्थानिकांकडून न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचा परिसर तातडीने सुरक्षित करण्याची मागणी जोर धरत आहे.
