पावसाच्या पाण्याने रस्ते-कारखाने जलमय; कामगार-उद्योजकांचे हाल, प्रशासनावर संताप
शशिकांत मोरे
धाटाव : सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धाटाव औद्योगिक वसाहतीसह परिसरातील कारखान्यांमध्ये आणि रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. निचऱ्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यांवर साचलेल्या पाण्याने वाहतुकीसह उद्योग व कामगार वर्गाचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.
पावसामुळे नालेसफाईचा बोजवारा
धाटावसह औद्योगिक क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाकडून मोठमोठ्या दाव्यांची सरबत्ती केली जाते. मात्र प्रत्यक्षात नालेसफाई नीट झाली नसल्याने गटारे तुंबली आहेत आणि पाणी रस्त्यावर साचून दलदल निर्माण झाली आहे. यामुळे रस्ते जलमय झाले असून औद्योगिक वसाहतीला “पाण्याखालचा शहर” असे स्वरूप प्राप्त झाले आहे.
उद्योगांवर थेट फटका
नीलिकॉन फूड डाइज, एफ.डी.सी., आयन एक्सचेंज, रोहा डाय केम, राठी डाय केम, बेक केमिकल आदी कारखान्यांजवळील रस्ते अक्षरशः नदीसारखे झाले होते. कारखान्यांच्या आवारातही पाणी घुसल्याने उद्योजकांना मालवाहतूक करणे, कामगारांना कंपनीत येणे-जाणे, तसेच आवारात वाहने उभी करणे अवघड झाले आहे. काही ठिकाणी तर कारच्या अर्ध्या चाकांपर्यंत पाणी भरलेले दिसून आले.
वाहतूक ठप्प, कामगारांची तारांबळ
औद्योगिक वसाहतीतील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ झाली. खड्डे चुकवताना अवजड वाहनांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले. संपूर्ण परिसरात वाहतूक संथ गतीने झाली असून काही ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. गुडघाभर पाण्यातून चालत जाणाऱ्या कामगारांचा जीव अक्षरशः हैराण झाला आहे.
विद्युत व दूषित पाण्याचा धोका
औद्योगिक वसाहतीतील अनेक रस्त्यालगत वीजवाहक डिपी असल्यामुळे साचलेल्या पाण्यामुळे शॉक बसण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यातच अनेक कारखान्यांच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाणी पुराच्या पाण्यात मिसळल्याने वेगवेगळ्या रंगाचे दूषित पाणी वसाहतीत पसरले. या पाण्यातून वाट काढत कामगारांना चालावे लागल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासनावर कामगारांचा संताप
“दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवते. नालेसफाई, निचऱ्याची व्यवस्था, आणि रस्त्यांची दुरुस्ती यावर प्रशासन गंभीर नाही. उद्योग सुरू ठेवायचे कसे आणि कामगारांनी यायचे कसे?” असा सवाल कामगार वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. अनेक कामगारांनी या परिस्थितीबद्दल संताप व्यक्त करत, “आम्हाला रोज रोज या दलदलीतून जाऊन जीव धोक्यात घालायचा का?” असा प्रश्न विचारला.
