खा. सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक
सलीम शेख
माणगाव: कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कोलाड ते माणगाव दरम्यानच्या पाच बायपाससाठी तब्बल २२ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आग्रहाखातर बुधवारी (१३ ऑगस्ट) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
मुंबई–गोवा महामार्गावर रखडलेली कामे, रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास याबाबत गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. १० ऑगस्ट रोजी मुंबई–गोवा महामार्ग जन आक्रोश समितीने महामार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि इतर मागण्यांवर आंदोलन छेडले होते. या आंदोलनादरम्यान समितीने उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत बैठक घेण्याची मागणी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंत्रालयात ही विशेष बैठक बोलावण्यात आली.
२ ऑगस्ट रोजी माणगाव येथे ॲड. राजीव साबळे यांच्या पक्षप्रवेश मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांनी कोलाड–माणगाव बायपासच्या कामांबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार केवळ दहा दिवसांतच राज्य सरकारकडून २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून कोलाड, इंदापूर आणि माणगाव परिसरातील पाच बायपासचे काम हाती घेण्यात येणार आहे. तातडीने काम सुरू करून ते शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक विशेषत्वाने महत्त्वाची मानली जात आहे. २७ ऑगस्टपासून कोकणात गणेशोत्सवाला सुरुवात होत असून लाखो कोकणवासीय या मार्गे आपल्या गावी जाणार आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळणे आणि प्रवास अधिक सुरक्षित करणे ही मोठी गरज होती. बैठकीत प्रवाशांच्या सोयीसाठी काही तातडीच्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालणे, महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश, संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्तासह बेरीगेट्स उभारणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करणे यांचा समावेश आहे.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवून कामांच्या वेळापत्रकाचा सविस्तर आढावा घेतला आणि प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीला गती देण्याचे आदेश दिले.
या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना खासदार सुनील तटकरे म्हणाले, “कोकणवासीयांना गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रचंड हाल सहन करावे लागतात. महामार्गावरील रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. या पार्श्वभूमीवर सरकारकडून मंजूर झालेला २२ कोटींचा निधी हा मोठा दिलासा आहे. बायपासची कामे गतीमान होतील आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.”
मुंबई–गोवा महामार्ग हा कोकणातील प्रवासाची जीवनवाहिनी आहे. अनेक वर्षांपासूनच्या रखडलेल्या कामांमुळे या महामार्गावरून प्रवास करणे हे प्रवाशांसाठी डोकेदुखीचे ठरले होते. आता २२ कोटींच्या मंजुरीनंतर कोलाड–माणगाव बायपासचे काम गतीमान होऊन आगामी गणेशोत्सवात कोकणवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
