वैभव कळस
म्हसळा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलेल्या “लोकप्रतिनिधित्वासाठी सर्वांना संधी” या तत्त्वानुसार म्हसळा नगर पंचायतीचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय नगराध्यक्ष संजय कर्णिक यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला आहे. १८ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना लेखी पत्राद्वारे हा राजीनामा सादर केला.
संजय कर्णिक यांनी दीड वर्षांचा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला. या काळात खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा नगर क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. नागरिकांच्या सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देत काम केल्यामुळे नगराध्यक्ष म्हणून त्यांची ओळख ‘लोकप्रिय नगरसेवक’ अशी झाली होती.
राजीनाम्याबाबत कर्णिक यांनी सांगितले की, पक्षशिस्त आणि सहकारी नगरसेवकांनाही पदाचा मान मिळावा यासाठी त्यांनी स्वखुशीने पद सोडले आहे. आता नगराध्यक्ष पदाची नवी निवड होईपर्यंत कार्यभार उपनगराध्यक्ष संजय दिवेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
म्हसळा नगर पंचायतीच्या पुढील नगराध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार, याची उत्सुकता स्थानिक राजकारणात आणि नागरिकांत निर्माण झाली आहे.
