मुरुड मिठेखार दरड दुर्घटनेच्या पाहणी दरम्यान उफाळला वाद
रायगड : अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यांतील रस्त्यांची दुरवस्था, अनेक प्रलंबित प्रश्न तसेच मुरुड मिठेखार येथे झालेल्या दरड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जबाबदार धरावे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याचदरम्यान “५० खोके” असा उल्लेख होताच शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांच्यावर धावून गेल्याने मोठा वाद निर्माण झाला.
या घटनेचा निषेध करण्यासाठी आज अलिबाग येथे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मानसी दळवी व त्यांच्या समर्थकांविरोधात काळे झेंडे, बॅनर दाखवून जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दरड दुर्घटनेनंतर वाद
मुरुड परिसरातील मिठेखार येथे दरड कोसळून विठा गायकर या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेची पाहणी करण्यासाठी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्याच वेळी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवीही तिथे दाखल झाल्या.
पाहणीदरम्यान बोलताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या, “ही बाब गंभीर आहे. यात राजकारण आणू नये. दोषी कोण आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. किती दिवस आम्ही चिखल रस्त्यावरून हाल सहन करायचे? आमच्या जीवनाला किंमत नाही का? गरीब माणसाच्या जीवाची किंमतच नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे त्या म्हणाल्या, “हे काय पन्नास खोके, कोण काय? सगळं घाणेरडं राजकारण आणि समाजकारण सुरू आहे.”
यावरूनच वाद चिघळला आणि मागे उभ्या असलेल्या मानसी दळवी अचानक चित्रलेखा पाटील यांच्या अंगावर धावून गेल्या. मात्र, उपस्थित नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून रोखली.
या प्रकारानंतर शेकाप कार्यकर्त्यांनी निषेध करत अलिबागेत आंदोलन केले असून, स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रतिनिधींवर निशाणा साधला आहे.
