• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हाडा वसाहतीतील ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे अनधिकृत टपऱ्या अखेर जमीनदोस्त

ByEditor

Aug 20, 2025

शशिकांत मोरे
धाटाव :
रोहा नगरपरिषद हद्दीतील म्हाडा वसाहतीसमोरील वादग्रस्त टपऱ्यांविरोधात ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेचा अखेर विजय झाला. बुधवारी पोलिस बंदोबस्तात सार्वजनिक बांधकाम विभागाने या टपऱ्या जमीनदोस्त केल्या. महिन्यांपासून चाललेल्या पाठपुराव्यानंतरही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि कारवाईस सुरुवात झाली.

मागील दीड-दोन महिन्यांपासून अनधिकृत टपऱ्यांमुळे वसाहतीतील रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. पावसाचे पाणी वसाहतीत घुसत होते, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ संतापले. अखेर बुधवारी साखळी उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाला धसका बसला आणि कारवाई पार पडली.

या मोहिमेदरम्यान म्हाडा वसाहतीतील शेकडो पुरुष व महिला रस्त्यावर उतरले होते. “अनधिकृत टपऱ्या हटल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही” असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. अखेर कारवाई झाल्यानंतर “कायदा बचाव, अतिक्रमण हटाव” अशा घोषणा देत ग्रामस्थांनी जल्लोष केला.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय बागुल यांनी टपऱ्या हटवण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार बुधवारी मोहीम राबवून टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या. या कृतीनंतर म्हाडा वसाहतीत दिलासा पसरला असून ग्रामस्थांनी “ही एकजुटीचा विजय आहे” अशी भावना व्यक्त केली.

म्हाडा वसाहतीतील ग्रामस्थ भिमेश भेकरे म्हणाले, “प्रशासनाचे सततचे दुर्लक्ष पाहता आम्हाला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला. पत्रकारांनी हा मुद्दा लावून धरल्यामुळेच कारवाई शक्य झाली. आम्हा सर्वांना आता मोकळा श्वास घेता येत आहे.”

दरम्यान, धाटाव व रोठ ग्रामपंचायत हद्दीतील रस्तालगत उभारलेल्या अनधिकृत टपऱ्यांवरही अशीच कारवाई होणार का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तथापि, म्हाडा वसाहतीत झालेल्या या मोहिमेने ग्रामस्थांच्या एकतेचे व आक्रमक भूमिकेचे सामर्थ्य पुन्हा अधोरेखित झाले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!