• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कशेणे–इंदापूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

ByEditor

Aug 20, 2025

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, युवासेना जिल्हाध्यक्ष विपुल उभारेंचे निवेदन

सलीम शेख
माणगाव :
तालुक्यातील कशेणे व इंदापूर परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रहिवासी भागात बिबट्याचे दर्शन वारंवार घडत असून, त्याचे दोन ते तीन वेळा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरण झाले आहे. यामुळे गावातील लहान मुले, महिला व वृद्धांना घराबाहेर पडणे धोकादायक ठरत आहे.

गेल्या काही दिवसांत या बिबट्याने गावातील कुत्रे, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या भीतीत आणखी भर पडली आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्याचीही भीती वाटत असून, शेतातील जनावरांवर बिबट्याचा हल्ला होण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेना युवासेना जिल्हाध्यक्ष विपुल उभारे यांनी वनविभागाकडे निवेदन सादर केले. माणगाव वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे यांना दिलेल्या या निवेदनात, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. “या भागातील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून, वन विभागाने तातडीने सापळे लावून बिबट्याला पकडून दूर जंगलात सोडावे,” अशी स्पष्ट भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.

युवासेना तालुकाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख सौरभ खैरे, निलेश पाखड, सरियार खान, रोहित मोहिते, सुजित राजमाने, तसेच इंदापूरचे वनपाल विलास तांबे, तळ्याचे वनपाल सुनिल नवगणे, आणि माणगाव वनक्षेत्राचे लेखापाल यावेळी उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “गेल्या काही दिवसांत पाळीव प्राणी व जनावरांवर झालेल्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुलांना शाळेत पाठवताना पालकांना सोबत जावे लागत आहे, तर महिलांना शेतात व बाजारपेठेत जाण्याचीही भीती वाटते. या परिस्थितीत तातडीने उपाययोजना न केल्यास ग्रामस्थांना मोठ्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”

विपुल उभारे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला प्राधान्य न दिल्यास व वनविभागाने तातडीची कारवाई न केल्यास शिवसेना–युवासेनेला वन विभाग कार्यालयावर तीव्र आंदोलन करावे लागेल.” या निवेदनाची प्रत जिल्हा वन अधिकारी तथा उपवनसंरक्षक रोहा, सहाय्यक वनसंरक्षक रोहा आणि जिल्हाधिकारी रायगड–अलिबाग यांना देण्यात आली आहे.

वन विभागाने याची नोंद घेतली असून, लवकरच आवश्यक ती पावले उचलली जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. तरीसुद्धा, ग्रामस्थांच्या मनातील भीती कायम असून, बिबट्याचा वावर नेमका कधी थांबतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्रामस्थांचा सवाल आहे की, “या परिस्थितीत जर कोणत्याही नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण झाला, तर जबाबदार कोण?” या गंभीर प्रश्नाचे उत्तर आणि ठोस उपाययोजना वनविभागाकडून अपेक्षित आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!