• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई किनाऱ्यावर गुजरातची मासेमारी बोट बुडाल्याने खळबळ; प्रशासन झोपेत

ByEditor

Aug 21, 2025

मोरा बंदरात एका खलाशाचा मृतदेह सापडला

अपघाताचे नेमके कारण, बोट कुठे व कशी बुडाली याचा उलगडा नाही

अनंत नारंगीकर
उरण :
अरबी समुद्रात गुजरात राज्यातील मासेमारी करणारी बोट बुडाल्याच्या चर्चेनंतर गुरुवारी (दि. २२) सकाळी मोरा बंदरात गुजरातमधील एका खलाशाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत प्रशासन अजूनही अनभिज्ञ असल्याचे समोर येत असून, अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.

मृत खलाशाचे नाव भरतभाई डालकी (वय ४४) असे असून, तो गुजरात राज्यातील रहिवासी आहे. त्याचा मृतदेह मोरा बंदर परिसरात आढळून आला.

गुजरातमधील वेरावल येथील भरतभाई कचराभाई डरी यांच्या मालकीची ‘भवानी गंगा’ नावाची मासेमारी बोट १९ ऑगस्ट रोजी वादळी हवामानाच्या इशाऱ्यामुळे सुरक्षिततेसाठी मोरा बंदरात दाखल झाली होती. या बोटीवर एकूण सात जण होते. त्यापैकी खलाशी भरतभाई डालकी हा शौचालयासाठी गेला होता, मात्र बराच वेळ उलटूनही तो परत आला नाही. त्याचा शोध घेण्यात आला, परंतु तो कुठेच आढळून आला नाही.

याबाबत मोरा सागरी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद (मिसिंग) करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस व सागरी सुरक्षा रक्षक दलाने शोध मोहीम हाती घेतली होती. अखेर गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला, अशी माहिती मोरा पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

दरम्यान, अलीकडेच समुद्रात गुजरातच्या बोटी बुडाल्याचे व्हिडिओ व वृत्त व्हायरल झाले होते. मात्र, याबाबत प्रशासन अजूनही अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट होत आहे. नेमकी कोणती बोट बुडाली, ती कुठे बुडाली, याची अधिकृत माहिती नाही.

मत्स्य विभाग मुंबईचे वरिष्ठ अधिकारी श्री. भादुले यांनी सांगितले की, “आमच्याकडे काही फोटो व माहिती आली आहे. त्यानुसार नौदल व कस्टम यांना कळवले आहे. मात्र, घटनेची तक्रार कुठेच दाखल नसल्याने अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही.”

या घटनेमुळे मत्स्य विभाग व प्रशासनाच्या निष्क्रियतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!