विनायक पाटील
पेण : चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया हि संस्था विद्यार्थ्यांसाठी सतत कार्यरत असते व त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी काही ना काही उपक्रम राबवत असते. याच उद्देशांतर्गत दि. १४ ऑगस्ट कॉम्प्युटर सायन्स दिनाचे औचित्य साधून लोणावळा येथील कल्पना चावला स्पेस सेंटर येथे रोबोटिक्स व सायबर अवेअरनेस या विषयावर कार्यशाळा आयोजित करून सार्वजनिक विद्यामंदिर साई या शाळेतील इयत्ता सहावी ते दहावीच्या निवडक मुलांसह भेट देण्यात आली.

यावेळी तेथे उपस्थित असलेले डॉ. पुष्पेंदू रक्षित व त्यांच्या टीमने विद्यार्थ्याशी हितगुज केले व त्यांना नवीन वैज्ञानिक व अंतरीक्ष ज्ञान याविषयी तसेच सायबर टेक्नॉलॉजी विषयी माहिती दिली. याबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वतः रोबोट तयार करण्याचा अनुभव व आनंद घेतला तसेच तेथील विविध प्रयोगशाळांना भेटी देऊन तेथील विविध प्रयोगाच्या साहित्यांची माहिती व वापर समजून घेतला आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागीही झाले.
सीएफआय संस्थेच्या प्रोग्राम मॅनेजर अक्षता सावंत, सोशल वर्कर साक्षी पाटील व पूजा वाडेकर या विद्यार्थ्यांसोबत स्वतः कार्यशाळेस उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी लोणावळ्याला जाण्यासाठी सीएफआय संस्थेने विद्यार्थ्यांची येण्या-जाण्याची व जेवणाची तसेच नाश्त्याची मोफत व्यवस्था केली होती. याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. हबळे, व्यवस्थापक देशमुख साहेब व सी.एफ.आय. संस्थेचे आभार व्यक्त केले तसेच सीएफआय संस्थेमार्फत नेहमीच विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेतले जातात यापैकीच हा आजचा उपक्रम अतिशय स्तुत्य असा होता असे नमूद केले. या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांसमवेत विद्यालयातील शिक्षक देखील सहभागी झाले होते.
