• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘केक वर्ल्ड’चे संस्थापक रोहन दिलीप म्हात्रे यांचे निधन

ByEditor

Aug 22, 2025

तरुण उद्योजकाची स्वप्ने अधुरी; कॅन्सरशी झुंज अखेर अयशस्वी

अमुलकुमार जैन
रायगड :
उरणचा धाडसी व स्वप्नाळू उद्योजक रोहन दिलीप म्हात्रे (वय ३८) यांचे कॅन्सरशी झुंज देत असताना निधन झाले. केवळ उद्योजक नव्हे, तर धाडसी विचारसरणी आणि समाजाभिमुख दृष्टिकोनामुळे ते सर्वत्र परिचित होते.

लहानपणापासूनच हटके शैली आणि वेगळे विचार हे त्यांचे वैशिष्ट्य. मित्रांसोबत थिएटर बुक करणे, कॉलेजच्या खोडकर आठवणी अशा गमतीजमतींसह रोहन नेहमीच लक्षात राहिले. “माझे मित्रही श्रीमंत झाले तर खरी मजा येते” हे त्यांचे वाक्य आजही सर्वांच्या ओठांवर आहे.

व्यावसायिक प्रवास

रिअल इस्टेट क्षेत्रातून करिअरची सुरुवात करताना त्यांनी द्रोणागिरी प्रकल्पात मॉड्युलर किचन, वाय-फायसारख्या त्या काळातील दुर्मिळ सुविधा दिल्या. परंतु शासकीय अडचणींमुळे तो प्रकल्प यशस्वी झाला नाही.

यानंतर 24 डिसेंबर 2015 रोजी कामोठे येथे ‘दी केक वर्ल्ड’ या स्टोअरची सुरुवात झाली. खेळण्यांच्या दुकानासारखे सजवलेले हे शॉप व प्रत्येक केकसोबत गिफ्ट देण्याची नवी संकल्पना ग्राहकांना भुरळ घालणारी ठरली. पहिल्याच दिवसापासून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे एका वर्षात 9 शाखा आणि 2020 पर्यंत तब्बल 70 दुकाने व 400 कर्मचाऱ्यांचा परिवार उभा राहिला.

केक वर्ल्डला त्यांनी केवळ दुकान न ठेवता स्टार्टअपसारखे उभारले. रिअल-टाईम सेल्स डेटा, ग्राहक पसंतीचे विश्लेषण, कर्मचाऱ्यांसाठी परदेशी टूर अशा अनेक संकल्पना त्यांनी राबवल्या. अगदी मर्सिडीज कारमधून केक डिलिव्हरी करण्याचाही त्यांनी विचार केला होता.

कठीण काळातील धैर्य

कोविड-19 महामारीच्या काळात जेव्हा अनेकांनी खर्च कपात केली, तेव्हा रोहन यांनी एकाही कर्मचाऱ्याला कमी न करता पगार वेळेवर दिले. दुकानांचे भाडे व इतर जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या. मिठाई चेन, बिर्याणी ब्रँड, शाकाहारी रेस्टॉरंट्स, चिप्स-वेफर्स अशा नव्या उपक्रमांची योजना त्यांनी आखली होती.

परंतु 2022 मध्ये कॅन्सरचे निदान झाल्यानंतर जीवनाने कठोर वळण घेतले. 20 हून अधिक प्रक्रिया, दोन मोठ्या शस्त्रक्रिया व वेदनादायी उपचारांनंतरही त्यांचा आत्मविश्वास कमी झाला नाही. हॉस्पिटलमध्ये असतानाच त्यांनी आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहायला सुरुवात केली होती.

अधुरी स्वप्ने, जिवंत वारसा

आज रोहन म्हात्रे नाहीत, तरी ‘केक वर्ल्ड’मधून त्यांची स्वप्ने जिवंत आहेत. कर्मचाऱ्यांबद्दलची जबाबदारी, समाजासाठीचा विचार आणि उद्योजकतेतील धाडसी दृष्टिकोन हीच त्यांची खरी ओळख ठरली. “एक केक, एक स्माईल आणि एक नवा उद्योजक निर्माण करत ते आजही आमच्यासोबत आहेत” असे कुटुंबीय, सहकारी व कर्मचारी भावनिक शब्दांत सांगतात.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!