• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

२५ हजारांची लाच घेताना तिघे जाळ्यात; रायगड जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर

ByEditor

Aug 23, 2025

रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची अलिबागेत कारवाई

अलिबाग │ अमुलकुमार जैन
शासकीय कामकाज झटपट व्हावे यासाठी अनेकदा कर्मचाऱ्यांकडून ‘टेबलाखालून’ रक्कमेची मागणी केली जाते. काहीजण काम पूर्ण व्हावे म्हणून तडजोड करतात, तर काही नागरिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मदत घेऊन दोषींना धडा शिकवतात. अशीच कारवाई रायगड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात करण्यात आली असून, दोन शासकीय कर्मचारी आणि एका ठेकेदाराला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

ही कारवाई २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजता करण्यात आली. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषद अलिबागच्या वित्त विभागातील कनिष्ठ सहाय्यक लेखा आशिष मदन कांबळे (३६), शिपाई दिलीप रामचंद्र कावजी (५६) आणि खाजगी ठेकेदार विलास भिकाजी ढेबे (२९) यांना पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत पेण तालुक्यातील मौजे-शेणे गावात केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत २०२२-२३ मध्ये पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम वडखळ येथील एम.एस.एस. कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला मिळाले होते. मात्र, वेळेअभावी कामाची जबाबदारी व कायदेशीर प्रक्रिया तक्रारदार यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी काम १५ जुलै २०२५ रोजी पूर्ण केले. यानंतर उर्वरित ६९ लाख रुपयांचे देयक मंजूर व्हावे म्हणून ते वारंवार जिल्हा परिषदेत पाठपुरावा करत होते.

या देयकासाठी शिपाई दिलीप कावजी यांनी सुरुवातीला ३५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर रक्कम २५ हजारांवर निश्चित झाली. ठरल्याप्रमाणे ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली. पैसे स्विकारल्यानंतर ती रक्कम वित्त विभागातील कनिष्ठ सहाय्यक लेखा व वित्त
विभाग पदावर कार्यरत असलेल्या आशिष कांबळे यांच्याकडे सुपूर्द केली व त्यांनी ती पुढे विलास ढेबे या खाजगी इसमाकडे याच्याकडे सुपूर्त केली.

या संपूर्ण प्रकरणात दोन शासकीय कर्मचारी व एक खाजगी इसम अशा तिघांना लाचेच्या रक्कमेसह अटक करण्यात आली असून, या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप अधिक्षक सरिता भोसले, पोलीस निरीक्षक निशांत धनावडे, नारायण सरोदे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, सुषमा राऊळ, पोलीस हवालदार महेश पाटील, परम ठाकूर, सुमित पाटील, सचिन आटपाडकर, मोनिका मोरे, मोमाली पाटील, सागर पाटील आणि श्री. घरत यांनी या कारवाईत महत्वाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेमधील वित्त विभागाताली भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

सप्टेंबर २०१५ मध्ये याच विभागातील मुख्य लेखापालावर लाच प्रकरणी कारवाई झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषद वित्त विभाग पुन्हा एकदा लाच प्रकरणामुळे चर्चेत आला आहे.

शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच त्यांच्या वतीने खाजगी इसम शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची रक्कम मागत असल्यास नागरिकांनी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड अलिबाग कार्यालय दुरध्वनी – 02141-222331 अथवा टोल फ्रि क्रं. 1064 यावर आपल्या तक्रारी नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!