• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गणेशभक्तांच्या उत्साहावर वाहतूक कोंडीचे विघ्न

ByEditor

Aug 23, 2025

महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा; माणगाव-इंदापूर परिसरातील नागरिक त्रस्त

माणगाव । सलीम शेख
कोकणातील सर्वात मोठा सण मानला जाणारा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना, माणगाव व इंदापूरच्या अरुंद रस्त्यांवरून होणारी भीषण वाहतूक कोंडी गणेशभक्तांच्या उत्साहावर पाणी फेरताना दिसत आहे.
मुंबई–गोवा महामार्गावरील काम ठप्प झाल्याने प्रवासादरम्यान भक्तांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठांमध्ये गाड्यांच्या रांगा लागल्याने व्यापारी आणि नागरिकांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत झाले आहे.

मुंबईकडून कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, सण चार दिवसांवर असतानाच महामार्गावर वाहनांचे लोंढे उसळले आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला असला तरी, रस्त्याची अपुरी क्षमता आणि माणगाव–इंदापूर येथील अरुंद रस्ते हीच कोंडीची मुख्य कारणे ठरत आहेत.

नागरिकांच्या मते, बायपासचे काम वर्षानुवर्षे कागदोपत्रीच अडकून बसल्याने शासनाची ढिलाई या गोंधळाला कारणीभूत आहे. आश्वासने वारंवार दिली जातात; मात्र प्रत्यक्ष कामाचा वेग अद्याप सुरू झालेला नाही. परिणामी, गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना तासन्तास कोंडीत अडकून बसावे लागते, तर स्थानिक रहिवाशांना दैनंदिन प्रवासासाठीही मानसिक त्रास सहन करावा लागतो.

गणेशभक्तांचे म्हणणे आहे की, “सणाच्या मार्गावरच जर विघ्न उभे राहत असेल, तर त्यासाठी शासनच जबाबदार आहे.” दरवर्षी या समस्येची तीव्रता वाढत आहे. वेळेत ठोस उपाययोजना न झाल्यास पुढील काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

सध्या माणगाव बाजारपेठ, इंदापूर व महामार्गावरील अरुंद रस्त्यांमुळे निर्माण झालेली कोंडी केवळ गणेशभक्तांचीच नव्हे तर संपूर्ण कोकणवासीयांच्या संयमाची कठीण परीक्षा घेत आहे. बायपासचे काम पूर्ण होईपर्यंत या समस्येत दिलासा मिळणे कठीण असून, त्याचा परिणाम प्रवाशांपासून स्थानिक नागरिकांपर्यंत सर्वांनाच भोगावा लागणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!