• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावर नेव्हीच्या स्पीडबोटीची प्रवासी लाँचला धडक; मोठी दुर्घटना टळली

ByEditor

Aug 24, 2025

अनंत नारंगीकर
उरण (२४ ऑगस्ट) : उ
रणजवळील समुद्रात पुन्हा एकदा नेव्हीच्या स्पीडबोटीने प्रवासी लाँचला धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र १७ डिसेंबर २०२४ रोजी निलकमल या प्रवासी बोटीला नेव्हीच्या स्पीडबोटीची धडक होऊन १४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्यामुळे सागरी प्रवासाच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

शुक्रवारी रात्री आठ वाजता संत ज्ञानेश्वर ही प्रवासी बोट मोराहून मुंबईच्या भाऊच्या धक्क्याकडे निघाली होती. साडेआठच्या सुमारास ही बोट मोरा बिकन आणि नेव्ही जेट्टीदरम्यान असताना, नेव्हीच्या स्पीडबोटीने तिला धडक दिली. धडक बोटीच्या कडेवर झाल्याने मोठा अपघात टळला. त्या वेळी प्रवासी बोटीत १० प्रवासी होते. अचानक झालेल्या धडकेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

स्थानिकांच्या मते, नेव्हीच्या स्पीडबोटी वारंवार बेदरकारपणे समुद्रात फिरत असतात. त्यांना जाब विचारला तर ते कोणीही न जुमानता दादागिरी करतात, अशीही तक्रार आहे.

या अपघाताबाबत भाऊचा धक्का येथील बंदर अधिकारी सुशिल सातेलकर यांनी सांगितले की, “मोरा येथून सुटणाऱ्या शेवटच्या प्रवासी लाँचला नेव्हीच्या स्पीडबोटीने धडक दिली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बोटीचे काहीसे नुकसान झाले. प्रवाशांना सुरक्षितपणे भाऊच्या धक्क्यावर आणण्यात आले.”

या घटनेची नोंद मुंबईतील यलोगेट पोलिस ठाण्यात लाँच मालकाने केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!