लागवडीसाठी दिलेली जमीन कोटींच्या व्यवहारातून विकली; शासनाकडे तक्रार दाखल
रायगड | अमुलकुमार जैन
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांची मुलगी सुहाना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण, तिने रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ थळ गावच्या समुद्रकिनाऱ्यालगत खरेदी केलेली जमीन वादग्रस्त ठरली आहे. तब्बल 12 कोटी 90 लाख रुपयांचा हा व्यवहार झाला असून, जमीन खरेदीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि स्थानिक महसूल विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
सदर जमीन ही 1968 साली रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने नारायण विश्वनाथ खोटे यांना “झाडे लागवडीसाठी” भाडेपट्ट्याने दिली होती. या जमिनीवर घर, इमारत वा अन्य कोणतेही बांधकाम करण्यास तसेच जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय विक्री, गहाण किंवा इतर व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली होती.
नंतर नारायण खोटे यांच्या निधनानंतर ही जमीन त्यांच्या वारसदार अंजली, रेखा आणि प्रिया खोटे यांच्या नावावर दाखल झाली. त्यानंतर खोटे कुटुंबीयांनी ही जमीन ‘वर्ग दोन’ मधून ‘वर्ग एक’ मध्ये रूपांतर करण्याचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला. मात्र, त्यावर अद्यापही अंतिम परवानगी मिळालेली नाही. तरीदेखील सुहाना खानने जून 2023 मध्ये या जमिनीचा सुमारे 12 कोटी 90 लाख रुपयांचा खरेदी व्यवहार केला.
नोंदणी आणि वाद
सदर खरेदीचा साठेकरार अलिबाग येथील उपनिबंधक कार्यालयात 1 जून 2023 रोजी नोंदणी करण्यात आला. त्यासाठी सुहानाने 77 लाख 46 हजार रुपये स्टॅम्प ड्युटी भरली. या जमिनीवर तिचा ताबा मिळाल्यानंतर खासगी सुरक्षा रक्षकही नेमण्यात आले आहेत.
परंतु, या जमिनीची विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी बंधनकारक होती. त्यासाठी खोटे कुटुंबीयांनी अर्ज केला असता, तहसील कार्यालयाने महसूल मंडळ निरीक्षकांकडून अहवाल मागवला. त्यात “सदर जमिनीवर कोणतेही बांधकाम नाही” असा अहवाल देण्यात आला.
मात्र, नोंदणीच्या वेळी जोडलेल्या कागदपत्रांमध्ये या जमिनीवर तीन बांधकामे असल्याचे व ग्रामपंचायतीकडून त्यांना घर क्रमांक दिल्याचे स्पष्ट झाले. यामुळे तहसील कार्यालयाचा चौकशी अहवाल खोटा असल्याचे उघड झाले.
सीआरझेडचा मुद्दा
या जमिनीचा एक भाग ‘कोस्टल रेग्युलेशन झोन’ (CRZ) मध्ये येतो. त्यामुळे येथे बांधकामे करणे नियमबाह्य ठरते. तरीदेखील या ठिकाणी बांधकामे झाल्याची चर्चा असून, प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचा आरोप स्थानिकांमध्ये केला जात आहे.
प्रशासनाच्या तत्परतेवर प्रश्नचिन्ह
साठेकरार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यांनी जागेवर प्रत्यक्ष पाहणी केली. एवढी तत्परता सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत दाखवली जाते का, असा सवाल आता स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे.
शासनाकडे तक्रार
या संपूर्ण व्यवहारावर ॲड. विवेकानंद दत्तात्रेय ठाकूर यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी कोकण आयुक्तांकडे अर्ज दाखल करून “शासनाने शेतकीसाठी दिलेली जमीन खाजगी व्यवहारासाठी वापरली गेली, म्हणजेच शर्तभंग झाला आहे. त्यामुळे सदर जमीन शासनजमा करण्यात यावी,” अशी मागणी केली आहे.
सुहाना खान हिने खरेदी केलेली ही जमीन फक्त तिच्या वैयक्तिक चर्चेचा भाग राहिलेली नसून, महसूल प्रशासनातील भोंगळ कारभार आणि नियमांना बगल देण्याच्या पद्धतीवर प्रकाश टाकते. अलिबागसारख्या संवेदनशील भागात जमिनीचे व्यवहार कसे होतात, याचे हे ठळक उदाहरण मानले जात आहे. आता या प्रकरणात शासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
