खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका, प्रवाशांची तातडीने दुरुस्तीची मागणी
उरण । अनंत नारंगीकर
उरण तालुक्यातील बहुतांश पुलांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अवजड वाहतुकीमुळे या खड्ड्यांची संख्या व आकार सतत वाढत असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मृत्यूचे सापळे ठरणाऱ्या या खड्ड्यांकडे जेएनपीटी, सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची भावना प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे. प्रवाशांची ठाम मागणी आहे की, एखाद्याचा जीव जाण्यापूर्वी हे खड्डे योग्य पद्धतीने बुजवावेत.

उरण तालुक्याच्या पूर्व विभागाला पश्चिम विभागाशी जोडण्यासाठी सुमारे ३० वर्षांपूर्वी खोपटा पूल बांधण्यात आला होता. जेएनपीटीच्या माध्यमातून परिसरात विकास वेगाने होत गेला. या काळात मोठमोठे सीएफएस कंटेनर यार्ड्स तयार झाले आणि पूर्व विभागातील जनतेसाठी खोपटा पूल म्हणजे ‘लाईफ लाईन’ बनला. मात्र वाढत्या वाहनांच्या प्रमाणामुळे, विशेषतः अवजड वाहतुकीच्या दडपणामुळे या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे एवढे खोल व मोठे झाले आहेत की अनेक प्रवाशांना कमरेचे त्रास उद्भवले आहेत. वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. याशिवाय या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचल्याने पुलाची मजबुती धोक्यात आली असून पूल कमकुवत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फक्त खोपटा पूलच नव्हे, तर जेएनपीटी बंदर आणि सिडको प्रशासनाने उरण, मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल शहरांना जोडण्यासाठी उभारलेले अनेक उड्डाण पूलही पावसाळ्यात खड्ड्यांनी विद्रूप झाले आहेत. नवघर, बोकडविरा, न्हावा शेवा पोलीस ठाणे, करळ, जासई, चिर्ले, पागोटे, धुतूम या परिसरातील पुलांची अवस्था विशेषतः चिंताजनक आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांत साचल्याने वाहनचालकांना संतुलन गमवावे लागते आणि त्यामुळे अपघातांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

देश-विदेशात मालाची निर्यात-आयात सुरळीत करण्यासाठी जेएनपीटी व सिडको प्रशासनाने मोठे प्रकल्प उभारले असले तरी रस्ते व पुलांची नियमित देखभाल करण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशांचे हाल पाहता, प्रशासनाचा हा दुटप्पीपणा अधिकच स्पष्ट होत आहे.
प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संबंधित विभागांनी तात्काळ पुलांची पाहणी करून खड्डे नीट बुजवावेत, पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा गंभीर अपघातांमुळे जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न प्रवासी व नागरिक उपस्थित करीत आहेत.