कर्जत । गणेश पवार
माथेरान घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. आज (शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५) पुन्हा एक अपघात घडला असून, ट्रायल टेस्टिंगसाठी असलेली एक कार जुम्मापट्टी येथील गणेश मंदिराजवळील वळणावर नियंत्रण सुटल्याने थेट लोखंडी रेलिंग तोडून नाल्यात अडकली. या कारमध्ये तीन तरुण प्रवास करत होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
याआधीही या घाटात अनेक अपघात झालेले आहेत. नुकतेच २५ ऑगस्ट २०२५ रोजी विक्रोळी (मुंबई) येथील पर्यटकांची स्विफ्ट कार (क्र. एमएच ०५ एजे ८९९१) पिटकर पॉईंटजवळील एस वळणावर अपघातग्रस्त झाली होती. त्या घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच आज पुन्हा एक दुर्घटना घडल्याने माथेरान घाटातील धोकादायक वळणांबाबत आणि रस्ता सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.