कोलाड । विश्वास निकम
गौरी-गणपती उत्सवानंतर पुन्हा एकदा गणेशभक्तांना साखर चौथी गणेशोत्सवाची आतुरता लागली होती. कोलाड परिसरातील गोवे गावात जय हनुमान मित्रमंडळ आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (१० सप्टेंबर) संकष्टी चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाची मूर्ती सिंहासनावर विराजमान करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने झालेले पूजन, आरती व मंत्रोच्चाराच्या गजरात “साखरचौथ बाप्पा” चे आगमन गावभर उत्साह निर्माण करणारे ठरले. दीड दिवस विराजमान राहिल्यानंतर गुरुवारी (११ सप्टेंबर) मोठ्या जल्लोषात व भक्तिमय वातावरणात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
गेल्या आठ वर्षांपासून हा उत्सव गोवे गावात अविरतपणे साजरा केला जात आहे. ग्रामस्थ, युवक व महिला मंडळ यांच्या पुढाकारामुळे हा उत्सव गावाच्या सामाजिक व सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक ठरत आहे. दीड दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या रात्री भजनांचा अखंड सोहळा रंगला, तर महिलांनी पारंपरिक नृत्यांच्या सादरीकरणाने वातावरण अधिकच रंगतदार केले. भक्तीभाव, नृत्य आणि संगीत यामुळे रात्रभर गावभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या उत्सवाला विविध स्तरावरील पदाधिकारी आणि मान्यवरांनी भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले व ग्रामस्थ तसेच युवक मंडळाच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. दुसऱ्या दिवशी बँजोच्या तालावर, ढोल-ताशांच्या गजरात, वाजत-गाजत आणि नाचत-गात गावकऱ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
गोवे गावचा हा साखर चौथ गणेशोत्सव केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारा ठरतोय. त्यामुळेच या उत्सवाबाबत गावकऱ्यांच्या मनात विशेष आकर्षण असून, वर्षानुवर्षे हा सोहळा अधिक जोशात साजरा करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
