न्यू इंग्लिश स्कूल जोहेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी घेतले बाप्पाचे दर्शन
पेण । विनायक पाटील
गणपती बाप्पाच्या मूर्तीचे माहेरघर म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जोहे गावात साखरचौथ निमित्त ‘जोहेचा राजा’ या गणपती बाप्पाची पाच दिवसांसाठी स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, जोहे येथील शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक वर्गाच्या हस्ते बाप्पाची पहिली महाआरती पार पडली.

पेण तालुक्यातील जोहे हे गणेश मूर्ती तयार करण्याचे मोठे केंद्र आहे. वर्षभर या गावातील कारागीर गणेश मूर्ती घडविण्यात व्यस्त असतात. श्रीगणेश चतुर्थीचा सोहळा संपल्यानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थीला पेण, पनवेल, उरण आदी तालुक्यांमध्ये ‘साखरचौथ गणपती’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २०१३ मध्ये स्थापन झालेल्या जोहेचा राजा प्रतिष्ठान तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाच दिवसांसाठी बाप्पा विराजमान झाले आहेत. प्रतिष्ठान शाळकरी मुलांचे दत्तकपालन, महिलांसाठी उपयुक्त शिबिरे, रक्तदान शिबिर यांसारख्या सामाजिक उपक्रमांत सातत्याने अग्रेसर राहिली आहे.
यावर्षीच्या स्थापनेत विद्यार्थ्यांना विशेष मान देण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल जोहेचे प्राचार्य उत्तम गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी बाप्पाच्या पहिल्या महाआरतीत सहभाग घेतला. या वेळी गायिका लावण्या महेश पाटीलच्या सुमधुर आवाजात आणि पार्थ सागर पाटीलच्या तबल्याच्या साथीने महाआरतीचा सोहळा अधिक भक्तिमय झाला.
या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानतर्फे वही, पेन, आरती संग्रह व खाऊ वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर बाप्पा दर्शना सोबतच या खास मानामुळे आनंदाचे व भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
महाआरती सोहळ्यास प्राचार्य उत्तम गलांडे, विनोद पन्हाळकर, अभिजित पाटील, संतोष घरत, गवळी, जोहेचा राजा प्रतिष्ठान चे संस्थापक देवा पेरवी, अध्यक्ष नारायण म्हात्रे, कार्याध्यक्ष विनोद म्हात्रे, वैभव धुमाळ, कमलाकर बोरकर, रवींद्र रसाळ, धनंजय पाटील, दीपक पाटील, निनाद धुमाळ यांसह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
