रायगड | अमुलकुमार जैन
आत्महत्या म्हणजे सहेतुकपणे स्वतःचे जीवन संपविण्याचे कृत्य. मानसिक ताण, नैराश्य किंवा वैयक्तिक कारणांमुळे असे टोकाचे पाऊल व्यक्ती उचलते. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाटा येथे घडली असून, परप्रांतीय तरुणाने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत तरुणाचे नाव सुजय ननीथुरा दफावार (वय २८, रा. कनकेश्वर फाटा, मूळ महिशुरा फकीरडंगा, श्रीरामपुर, नदिया, पश्चिम बंगाल) असे आहे.
सविस्तर माहिती अशी की, अलिबाग पोलिस ठाणे हद्दीतील कनकेश्वर फाटा येथे श्रीकृष्ण परेश देवनाथ (वय ३४, व्यवसाय – चायनिज फूड सेंटर मालक, रा. कनकेश्वर फाटा, जि. रायगड) यांच्या मालकीचे न्यू स्वाद नावाचे चायनिज फूड सेंटर आहे. या सेंटरमध्ये सुजय दफावार वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी सुजय यांनी सेंटरमधील आतल्या खोलीत मद्यप्राशन केले. त्यानंतर त्यांनी सीलिंग फॅनला दोरी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने ही बाब सेंटरचे मालक श्रीकृष्ण देवनाथ यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने सुजयला खाली उतरवले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.
देवनाथ यांनी सुजयला तत्काळ जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात ५५/२०२५ भा.दं.सं. १९४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जोशी करीत आहेत.
