अदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील घटना; मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह
रायगड | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील एका नामांकित विद्यालयासमोर घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे पालकवर्ग आणि समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळेच्या सातवीच्या वर्गासमोर उभे राहून एका व्यक्तीने अल्पवयीन शाळकरी मुलींसमोर अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेने स्थानिक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश गोपीनाथ देवगडे असे आरोपीचे नाव असून तो काळ्या रंगाच्या बुलेट मोटारसायकलवर मास्क लावून शाळेच्या परिसरात प्रवेश केला होता. प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता त्याने बेकायदेशीरपणे मागील गेटमधून शाळेच्या आवारात प्रवेश केला. सातवीच्या वर्गात तासिका सुरू असताना, आरोपीने शर्ट वर करून पॅन्टला हात लावून अश्लील हावभाव करत मुलींकडे इशारे केले. या घटनेमुळे वर्गातील चार अल्पवयीन विद्यार्थिनींच्या मनात तीव्र लज्जा आणि भीती निर्माण झाली.
सदर घटनेबाबत विद्यार्थिनींनी वर्गशिक्षिकेला माहिती दिली. त्यानंतर शिक्षिकेने मुख्याध्यापिकांना या प्रकाराबद्दल सांगितले. तातडीने मुख्याध्यापिकेने पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली.
या प्रकरणी गु. रजि. नं. ६८/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७९ तसेच ‘पोस्को कायदा २०१२’ (POCSO Act) कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनेनुसार स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक अधिक तपास करत आहेत.
विशेष म्हणजे, आरोपी कल्पेश देवगडे हा श्रीवर्धन मतदारसंघातील आहे. या मतदारसंघाचे आमदार तसेच राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आहेत. त्यांच्या मतदारसंघातच अशा घटना घडत असल्याने सामाजिक वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मंत्री तटकरे यांच्याच जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अशा प्रकारचे प्रकार घडत असतील, तर उर्वरित महाराष्ट्रात महिलांची व मुलींची सुरक्षितता किती धोक्यात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्यावर्षी बदलापूर येथे एका शाळेत शिपायाकडून चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्य हादरले होते. आता रायगडमधील घटनेमुळे पुन्हा एकदा शालेय मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
