आदेश न पाळणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
घनःश्याम कडू
उरण : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद-नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या तीव्र लढ्यानंतर अखेर राज्यातील हजारो सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांनी १० सप्टेंबर रोजी आदेश निर्गमित करून सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींना नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून औरंगाबाद खंडपीठाच्या स्थगितीमुळे वारसाहक्क नियुक्त्या थांबल्या होत्या. संघर्ष समितीचे नेते डॉ. डी. एल. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. सुरेश ठाकूर, संतोष पवार, अनिल जाधव यांनी न्यायालयीन पातळीवर सातत्याने लढा दिला. अखेर ८ जानेवारी २०२५ रोजी स्थगिती उठवल्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आदेश काढला होता.
तरीदेखील अनेक नगरपरिषदांचे मुख्याधिकारी नियुक्ती देण्यास टाळाटाळ करत होते. ९ सप्टेंबर रोजी नवी मुंबई येथील संचालनालयावर संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आयुक्त कृष्णा यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आदेश निर्गमित करण्यात आला.
या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येईल. या निर्णयामुळे राज्यभरातील सफाई कामगारांच्या कुटुंबांमध्ये आनंदाची लाट पसरली असून संघर्ष समितीच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे.
