माणगाव । सलीम शेख
माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील निजामपूर येथे सुरू असलेल्या मटका जुगार रॅकेटवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) कारवाई केली. निजामपूर बसस्थानकाजवळील विमल निवास इमारतीच्या जिन्याखाली सुरू असलेला हा जुगार उघडकीस आला.
छाप्यात प्रकाश पांडुरंग पाकड याला जुगाराच्या आकडेमोडीसह रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडील मोबाईल जप्त करून पंचनामा करण्यात आला. मोबाईल तपासात ‘PakhadDo/No’, ‘Praksha Np Konkan’, ‘FINAL KHABAR’, ‘PAKHD KO/MO’ अशा नावाचे व्हॉट्सअप ग्रुप आढळले. या ग्रुपमधून कल्याण नावाच्या मटका जुगाराचे आकडे प्रसारित करून स्वतःच्या फायद्यासाठी जुगार खेळवला जात असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी प्रकाश पांडुरंग पाकड याच्यासह प्रकाश पांडुरंग सावंत (रा. निजामपूर), राजेश कांतिलाल छेडा (रा. माणगाव), संदीप शहाजी चव्हाण (रा. कुमशेत-दहीवली), हितेन कांतिलाल छेडा (रा. माणगाव) आणि सदानंद दत्ताराम जाधव (रा. सुरव ता. माणगाव) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार किरण तुणतुणे करीत आहेत.
दरम्यान, रायगड पोलीसांनी गुन्हेगारीविरुद्ध नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी “रायगड दृष्टी” हा नवा व्हॉट्सअप चॅटबॉट सुरू केला आहे. या माध्यमातून नागरिक मटका जुगार, अवैध दारू व्यापार, अंमली पदार्थ व इतर बेकायदेशीर कारवायांबाबत पूर्णपणे गुप्तपणे तक्रार नोंदवू शकतील. प्राप्त तक्रारी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवून त्वरित कारवाई केली जाणार आहे.
