उरण । अनंत नारंगीकर
दारूमुळे संसार उद्ध्वस्त होणे, सतत वाद-विवाद निर्माण होणे ही नवी बाब नाही. त्यामुळेच उरण तालुक्यातील वशेणी गावातील महिलांनी दारूबंदीची ठाम भूमिका घेतली आहे. दारूचे दुकाने बंद करावीत या मागणीसाठी गावातील महिलांनी ग्रामसभेत ठराव मांडून तो एकमताने मंजूर करून घेतला.
यासोबतच गावात दारूबंदी आणि लग्नसमारंभातील हळदीच्या साड्या बंद करण्यासाठी बुधवारी (दि. १७) महिलांनी जनजागृती रॅली काढली.

गावात दारूची खुलेआम विक्री सुरू असून तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या गंभीर प्रश्नाकडे पोलीस पाटील आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. शांतता भंग होणे आणि वारंवार वाद निर्माण होणे यावर तोडगा काढण्यासाठी महिलांनी आक्रमक भूमिका घेतली.
मंगळवारी (दि. १६) झालेल्या ग्रामसभेत सरपंच सौ. अनामिका हितेंद्र म्हात्रे, उपसरपंच प्रजा बळीराम पाटील, ग्रामपंचायत अधिकारी विद्या भाटकर तसेच सदस्य यांच्या उपस्थितीत दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला.

दारूबंदीबरोबरच लग्नसमारंभातील हळदीच्या साड्यांवर होणारा अनाठायी खर्च थांबवण्यासाठी साड्यांची प्रथा बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
बुधवारी (दि. १७) आयोजित जनजागृती रॅलीत सरपंच अनामिका म्हात्रे, उपसरपंच प्रजा पाटील, सदस्या अस्मिता पाटील, शेवंती पाटील, जयंता म्हात्रे, ज्योत्स्ना पाटील, प्रिती पाटील यांच्यासह करुणा पाटील, सुगंधा गावंड, काशी गोंधळी, संगिता म्हात्रे, सखुबाई ठाकूर, स्नेहल पाटील, आशा पाटील, सामाजिक कार्यकर्ते गणेश म्हात्रे, जयंत म्हात्रे आदींसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या.
जोपर्यंत हि दारु बंद होत नाही तोपर्यंत जनजागृती सुरूच राहील अशी भूमिका महिला व ग्रामस्थांनी घेतली आहे. वशेणी येथे गेल्या काही वर्षापासून गावठी दारू विक्री खुलेआम सुरू आहे. गावातील तरुण वर्गाला दारूचे व्यसन लागले असून काहींचे संसार मोडले आहेत. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. तसेच लग्न समारंभातील हळदीच्या साड्यांवर वारेमाप होणारा खर्च टाळण्यासाठी साड्यांची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
-अनामिका हितेंद्र म्हात्रे,
सरपंच वशेणी ग्रामपंचायत
