उरण । घनःश्याम कडू
दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी अखेर तारीख ठरल्याचे वृत्त समोर आले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी विमानतळाचा भव्य शुभारंभ सोहळा आयोजित करण्याची तयारी राज्य सरकार आणि सिडको प्रशासनाच्या स्तरावर वेगाने सुरू आहे.
या निमित्ताने विमानतळाच्या धावपट्टीवर सर्वप्रथम पंतप्रधान प्रवास करणारे विमान उतरवले जाणार असून, उद्घाटन सोहळ्यानंतर त्याच विमानाने परतीचा प्रवास होईल, अशी चर्चा आहे. सध्या सिडको मंडळ व विमानतळ प्रकल्पाशी संबंधित विविध स्तरांवर सलग बैठका सुरू आहेत.
जरी अद्याप अधिकृत घोषणाच झालेली नसली तरी, उद्घाटनापर्यंत अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यापूर्वी या विमानतळावर सैन्यदलाची विमाने उतरवून यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या होत्या. मात्र आता अधिकृतपणे पंतप्रधानांच्या उपस्थितीत विमानतळाचा प्रारंभ होणार असल्याचे संकेत आहेत.
उद्घाटन सोहळ्यानंतर प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्यासाठी अजून किमान एक ते दीड महिना लागणार आहे. या काळात केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना (सीआयएसएफ, सीमा शुल्क विभाग, पारपत्र विभाग) विमानतळ हस्तांतरण, अंतिम स्वच्छता आणि काही कामांचा समारोप केला जाणार आहे.
ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, त्यापूर्वीच विमानतळाचे उद्घाटन पार पाडण्यासाठी सरकारकडून जलद गतीने हालचाली सुरू असल्याचे समजते.
गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा प्रकल्प आता पूर्णत्वास जात आहे. भूमिपूजनापासून ते उद्घाटनापर्यंत दोन्ही सोहळ्यांचा मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याने भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान, विमानतळाला कोणते अधिकृत नाव द्यायचे यावर अजूनही निर्णय झालेला नाही. मात्र स्थानिक भाजप आमदार व कार्यकर्त्यांकडून लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी जोरदार पाठपुरावा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीनेही दि. बा. पाटील यांच्या नावासाठी वाहनफेरी काढून सरकारचे लक्ष वेधले.
