सागर दहिंबेकर यांच्या नेतृत्त्वाखाली तरुणांचा जीवाची पर्वा न करता जिगरबाज बचावकार्यात सहभाग; सर्वत्र कौतुक
धाटाव/रोहा । शशिकांत मोरे
राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून विशेषतः मराठवाड्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांनी रौद्ररूप धारण केल्याने शेकडो गावांना पुराचा वेढा बसला असून हजारो नागरिक अडकून पडले आहेत. या गंभीर परिस्थितीत रोह्यातील सह्याद्री वन्यजीव प्राणी संरक्षणार्थ संस्थेच्या सदस्यांनी सागर दहिंबेकर यांच्या नेतृत्वाखाली जीवाची पर्वा न करता बचाव कार्याला सुरुवात केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील लहूगाव व धाराशिव परिसरात मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी गावात शिरले. अनेकांचा जीव धोक्यात आला. यावेळी रोह्यातील टीमने जवानांच्या खांद्याला खांदा लावून शेकडो अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले. एका हातात जीव व दुसऱ्या हातात धैर्य घेऊन या तरुणांनी पुराच्या पाण्यातून लोकांना बाहेर काढत मोठे कार्य केले.
मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी शासनाच्या मदतीकडे टाहो फोडत आहेत. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
सोलापूर परिसरातील स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी रोह्यातील जवानांना योग्य मार्गदर्शन दिले असून सर्वतोपरी सहकार्य केले आहे. दरम्यान, रोह्यातील या तरुणांच्या जिगरबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रायगड जिल्ह्यातील विविध रेस्क्यू मोहिमेत नेहमी पुढे असलेली ही टीम आता मराठवाड्यात सक्रिय झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या जवानांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी रोहेकर नागरिक ग्रामदैवत धाविर देवाच्या चरणी प्रार्थना करीत आहेत.
