स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
माणगाव | सलीम शेख
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने बेकायदेशीर अग्निशस्त्र ताब्यात बाळगल्याप्रकरणी महाड तालुक्यातील दोघा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवार, दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी आमडोशी फाटा येथे करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे कृणाल रामचंद्र सर्कले (रा. सांदोशी, ता. महाड) हा आमडोशी फाटा येथे शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. सकाळी १०:०५ वाजता सर्कलेला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळले. चौकशीदरम्यान हे शस्त्र लक्ष्मण सीताराम पवार उर्फ बाबू (रा. कोथुर्डे, सोनारवाडी, ता. महाड) याचे असल्याचे उघड झाले.
दोघांकडेही शस्त्राचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४८/२०२५, कलम शस्त्र अधिनियम १९५९ चे ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी देशी बनावटीचे २५ हजार रुपये किंमतीचे पिस्तूल व ५०० रुपयांचे जिवंत काडतूस असा एकूण २५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास महाड पोलिसांकडून सुरू आहे.
