महिला सबलीकरण, नारीशक्ती व ऊर्जा बचतीवरील पोस्टर प्रदर्शन
नागोठणे | प्रतिनिधी
येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सामाजिक भान, महिला सबलीकरण, नारीशक्ती, ऊर्जा बचत आदी विषयांवर विशेष भर देण्यात आला.

पोस्टर प्रदर्शनाने आकर्षण
या दिनानिमित्त महाविद्यालयात सुमारे २५ पोस्टर्सचे प्रदर्शन भरविण्यात आले. अंतर्गत मुल्यमापन समिती प्रमुख डॉ. संदेश गुरव यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी प्राचार्य डॉ. दिनेश भगत, कार्यक्रम अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
विकसित भारत २०४७ – युवकांसाठी ध्येय
दुसऱ्या सत्रामध्ये प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “विकसित भारत-२०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी निःस्वार्थ भावनेने कार्य करावे. स्वतःच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करणे हेच खरे राष्ट्रसेवेचे कार्य आहे,” असे आवाहन केले.
यावेळी डॉ. संदेश गुरव यांनी विद्यार्थ्यांनी प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
एचआयव्ही-एड्स विषयक मार्गदर्शन
कार्यक्रमादरम्यान जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रोहा तालुका समन्वयक महेश गोसावी यांनी उपस्थितांना एचआयव्ही-एड्स संदर्भात मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांनी या विषयाविषयी जागरूक राहून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास, ध्येय व उद्दिष्टे स्पष्ट केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सलोनी सिंग हिने केले, तर आभारप्रदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोहर शिरसाठ यांनी मानले.
या कार्यक्रमास वनस्पती विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय चव्हाण, प्रा. डॉ. विलास जाधवर, प्रा. डॉ. विकास शिंदे, डॉ. राणी ठाकरे, प्रा. चैत्राली पाटील यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कु. सुमित, कु. कुणाल, कु. पूजा, कु. सानिका यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. शेवटी राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
