‘मनमुक्त फाऊंडेशन’ तर्फे चाकोरीबाहेरील मैत्रीणी कृतज्ञता सोहळ्यात गौरव
सोगाव | अब्दुल सोगावकर
जिद्द, संघर्ष आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या अलिबाग तालुक्यातील कन्या ॲड. प्रतिक्षा प्रकाश वडे (वारंगे) यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन पनवेल येथे सन्मान करण्यात आला. शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ‘मनमुक्त फाऊंडेशन’ तर्फे आयोजित ‘चाकोरीबाहेरील मैत्रीणी कृतज्ञता सोहळा’ या ऐतिहासिक कार्यक्रमात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
न्यायासाठी लढणाऱ्या सरकारी वकिलांचा गौरव
मुळच्या मुनवली, ता. अलिबाग येथील असलेल्या प्रतिक्षा वडे या पनवेल न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. आपल्या वकिली व्यवसायातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक व निःस्वार्थ कार्य केले. विशेषतः विविध प्रकारच्या प्रकरणांमध्ये सामान्य माणसांना कायद्याच्या आधारे योग्य न्याय मिळवून देण्यात त्यांनी घेतलेली मेहनत आणि भूमिका याची दखल मनमुक्त फाऊंडेशनने घेतली आणि त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले.
या दैदिप्यमान सोहळ्याला राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मनीषा वर्मा (अपर मुख्य सचिव, प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन विभाग, महाराष्ट्र), अंजली ढमाळ (उपसंचालक, मराठी भाषा विभाग, मंत्रालय), डॉ. वैशाली पाटील (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व संचालिका, अंकुर ट्रस्ट), ललिता बावर (उपआयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका) यांच्यासह मनमुक्त फाऊंडेशनच्या संचालिका अस्मिता कालन, मनिषा कुन्हाडे, मुक्ता भोसले उपस्थित होत्या.
दहा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा कर्तृत्ववान महिलांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा सोहळा महिलांच्या योगदानाचा गौरव करणारा ठरला.
या ऐतिहासिक पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. पराग कालन व दिव्या भोसले यांनी केले. यावेळी डॉ. राजेंद्र कुन्हाडे यांनी भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पनवेलमध्ये झालेला हा सोहळा दैदिप्यमान, वैभवशाली व नावीन्यपूर्ण ठरला असून अलिबागच्या कन्येने मिळवलेला हा मान गावासाठीही अभिमानाचा ठरला आहे.
