• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सुरगड संवर्धन संस्थेची अखंड गडसंवर्धन मोहीम

ByEditor

Sep 24, 2025

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्साई माता मंदिर परिसराची स्वच्छता

कोलाड | विश्वास निकम
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील दुर्ग संवर्धनाच्या कार्याला अखंडपणे चालना देणाऱ्या स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेने नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून २१ सप्टेंबर २०२५ रोजी सुरगड संवर्धन मोहिमेची आडोतीसावी आवृत्ती यशस्वीपणे राबवली. या मोहिमेत गडाची गडदेवता अन्साई माता मंदिर परिसर आणि गडमार्ग स्वच्छ करण्यात आला.

मंदिर परिसर आणि गडमार्ग स्वच्छ

अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात झालेल्या या मोहिमेत मंदिर परिसरातील वाढलेली काटेरी झुडपे हटवण्यात आली. तसेच अतिवृष्टीमुळे गडमार्गावर पडलेली झाडे व फांद्या बाजूला करून मार्ग स्वच्छ करण्यात आला. दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने अन्साई माता मंदिरात शस्त्रपूजन व गडपूजन केले जाते. या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून शिलेदारांनी गडाची स्वच्छता करून संवर्धन कार्याला गती दिली.

ही मोहीम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजय भोसले आणि सल्लागार विश्वास सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांच्या प्रेरणेने स्थानिक युवकांनी पुन्हा एकदा दुर्गसंवर्धनासाठी आपला वेळ व श्रम अर्पण केले.

शिलेदारांचा उत्साही सहभाग

या मोहिमेत पंकज सावरकर, किशोर सावरकर, अथर्व कापसे, अजय भोसले, सुरज भिसे, सिद्धेश शेलार, योगेश गुजर, ललित जाधव, महेश किर्दत, आदित्य पवार, विराज तेलंगे, शुभम महाबळे, पियुष चोरगे, मनीष धामणसे, श्रेयश सावरकर, ललित पवार, प्रथमेश सावरकर, सोहम जावके, हेमंत मालुसरे, विश्वास सानप, विशाल पवार, सुरेश पार्टे आदी शिलेदारांचा उत्साही सहभाग होता.

दुर्गसंवर्धनासाठी समाजाची साथ आवश्यक

नवरात्रासारख्या धार्मिक व सांस्कृतिक सणांच्या निमित्ताने होत असलेल्या या गडसंवर्धन मोहिमा गडांचा इतिहास, परंपरा आणि स्वच्छता यांना नवे बळ देतात. शिलेदारांनी दिलेला सहभाग पाहता भविष्यात अधिकाधिक युवक या चळवळीत सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!