उरण । विठ्ठल ममताबादे
उरण-द्रोणागिरी नोड येथे भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि नवीन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे हा कार्यक्रम जनसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरला.
या वेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षा संगीता रवींद्र गायकवाड यांची भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य रवी भोईर, युवा नेते प्रतिम म्हात्रे, उरण शहर ग्रामीण मंडल अध्यक्ष प्रसाद भोईर, उरण ग्रामीण मंडल अध्यक्ष धनेश गावंड, महिला मोर्चा अध्यक्ष राणी म्हात्रे, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, द्रोणागिरी नोड अध्यक्ष शेखर पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगीता गायकवाड या भारतीय जनता पक्षाच्या कट्टर, एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या कार्याची दखल घेतच त्यांची उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी निवड करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नियुक्तीनंतर भावना व्यक्त करताना संगीता गायकवाड म्हणाल्या, “भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल मी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आभारी आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन संघटन मजबूत करून निवडणुकांत भाजपाला यश मिळवून देण्यासाठी मी सतत सक्रिय राहीन.”
तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व महिला मोर्चा अध्यक्ष राणी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे ध्येय, धोरणे आणि कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्याचा विश्वास व्यक्त केला.
