परिसरात खळबळ, एका महिलेवर रसायन उडाल्याने उपचारासाठी दाखल
रोहा/धाटाव । शशिकांत मोरे
रोहा-कोलाड रस्त्यावर भरदिवसा एका अज्ञात टँकर चालकाने कुंडलिका नदीपात्रात घातक रसायन सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून चालकाने टँकरसह पलायन केल्यामुळे कोलाड पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
ही घटना दुपारी दोनच्या सुमारास अशोकनगर आणि पालेखुर्द गाव हद्दीत घडली. टँकरमधील काळ्या रंगाचे रसायन नदीपात्रात सोडताना काही प्रमाणात रसायन रस्त्यावरही सांडले. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना डोळे चुरचुरण्याचा त्रास झाला. याचवेळी एका महिलेच्या अंगावर रसायन उडून तिला दुखापत झाली असून तिला रोह्यातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रोह्यातील सह्याद्री वन्यजीव प्राणी संरक्षणार्थ संस्थेचे सदस्य प्रणय शिंदे आणि शरद दिसले यांनी ही घटना प्रथमदर्शनी पाहताच टँकरचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने पलायन केले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर कोलाड पोलिसांनी चालक व टँकर मालकाच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की गुजरात, पुणे, चिपळूण येथून रसायन घेऊन येणारे टँकर धाटाव औद्योगिक वसाहतीत माल उतरवल्यानंतर नदीपात्रात रसायने सोडण्याचे प्रकार नक्की कसे घडतात? प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आरोपही होत आहेत.
या घटनेनंतर परिसरातील नागरिक व पर्यावरणप्रेमींमध्ये संताप पसरला असून प्रदूषण नियंत्रण मंडळाची पुढील कारवाई काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर घटनास्थळी पाहणी केली असता संबंधित टँकर चालकाने नदी पात्रात रसायन सोडून रसायन रस्त्यावर इतरत्र पडल्याचे पहावयास मिळाले.संबंधित टँकर कोलाडबाजूकडून येऊन कुंडलिका नदी पात्रात रिकामा करून गेल्याचा अंदाज आहे.मात्र इतर ठिकाणाहून येऊन कुंडलिका नदी पात्रात रसायने रिकाम्या करणाऱ्या टँकरचालक,मालक यांच्यावर कारवाई करावी असे पोलिस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठांना आम्ही कळविले आहे.
-दयानंद नांदगावकर,
कार्यकारी व्यवस्थापक, रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन
