एक कोटीहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; अनेक सट्टेबाज व आयोजक अटकेत
रायगड । अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील गोंदाव गावातील टायगर गोट फार्म या ठिकाणी शेकडो लोकांसमोर चालू असलेल्या मेंढ्यांच्या झुंजीवरून सट्टा आणि जुगार सुरू असल्याची माहिती पाली पोलिसांना मिळाली. रविवारी (ता. 21) पोलिसांनी धाड टाकून या सट्टा जुगारावर छापा टाकला आणि एक कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला. तसेच काही जणांना अटक करण्यात आली असून, काही आरोपी फरार आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या गुप्त माहितीनुसार, पाली पोलिसांनी पोलिस उपनिरीक्षक प्रसाद मधुकर पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. धाडीत पोलिसांनी झुंजीसाठी आणलेले ४ मेंढे, रोख रक्कम १० लाख ३७ हजार रुपये, तब्बल १.२७ कोटींची किंमत असलेली वाहने (दुचाकी व चारचाकी), मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण १.३७ कोटींपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी शेख मोहम्मद शोएब, मोहम्मद अमान खान, आर्यन जाधव, सरफराज शेख, शेख फराज, अनुज जगताप, अजरुद्दीन मंसी, समीर सय्यद यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या धाडीत प्राण्यांना क्रूरतेने वागविल्याबाबतचा कायदा 1960 कलम 11(1) (M)(N) तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 कलम 4, 5, 12 (ब)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई, पीएसआय श्री. सरगर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस सक्रिय सहभागी होते. या धाडसी कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात मेंढ्यांच्या झुंजीच्या नावाखाली सट्टा किती मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एम. निकम करीत आहेत.
जनतेला आवाहन
पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, प्राण्यांचा वापर करून त्यांना क्रूरतेने वागवून आर्थिक फायद्यासाठी झुंजी लावणे, मारामारी आयोजित करणे किंवा त्यावर सट्टा लावणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे कृत्य आढळल्यास किंवा त्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. संबंधित संपर्क क्रमांक आहेत:
- पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड-अलिबाग हेल्पलाइन: 112
- पाली पोलीस ठाणे: 02142-242223
पोलिसांनी अशा प्रकरणांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
