माणगाव व पेण तालुक्यात चौघांविरोधात गुन्हे दाखल; अल्पवयीन मुलींचे जबरदस्तीने लावले विवाह, एकीला अपत्यप्राप्ती
रायगड । अमूलकुमार जैन
बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. तरीदेखील ग्रामीण व आदिवासी भागांत हा प्रकार अजूनही सुरू असल्याचे रायगड जिल्ह्यातील दोन प्रकरणांतून स्पष्ट झाले आहे. माणगाव आणि पेण तालुक्यात अल्पवयीन मुलींचा विवाह लावून दिल्याने, दोन्ही प्रकरणांत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एका पीडितेने विवाहानंतर अल्पवयातच बाळाला जन्म दिल्याने या गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले आहे.
माणगाव तालुक्यातील घटना
माणगाव तालुक्यातील एका गावात १२ वर्षे ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याचे उघड झाले आहे. तक्रारदार महिलेच्या पतीने मुलगी लहान असल्याचे सांगूनही तिचा विवाह रामा (नाव बदललेले) या तरुणाशी २०२३ साली लावून दिला होता. यावेळी आरोपी पतीचे आई-वडीलही विवाहासाठी उपस्थित होते. विवाहानंतर अल्पवयीन पीडिता सासरी नांदत असताना तिचा पती रामा याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून ती गर्भवती झाली आणि बाळाला जन्म दिला.
या प्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात गु.र. नं. १९९/२०२५ नोंदवण्यात आला आहे. आरोपी पती रामा, त्याचे आई-वडील तुका व सुकी तसेच मुलीचे वडील सदा या चौघांविरोधात बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम २०१२ तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घुगे करीत आहेत.
पेण तालुक्यातील घटना
याचप्रमाणे पेण तालुक्यातील एका गावात १७ वर्षे ५ महिने वयाच्या मुलीचा विवाह २२ वर्षीय तरुणाशी मे २०२४ मध्ये समाजातील रीतिरिवाजांप्रमाणे लावून देण्यात आला होता. विवाहानंतर पतीने अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती झाली. परिणामी, अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात तिने एका मुलाला जन्म दिला.
या प्रकरणी पेण पोलिस ठाण्यात गु.र. नं. १७५/२०२५ दाखल करण्यात आला असून, आरोपी पती, सासू-सासरे व पीडितेचे पालक यांच्याविरोधात POCSO अधिनियम व बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण करीत आहेत.
कायद्याकडे दुर्लक्ष
बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असतानाही रायगडसारख्या जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकार उघडकीस येत आहेत, हे धक्कादायक आहे. विशेषतः आदिवासीबहुल, दुर्गम भागांत अजूनही समाजातील दबावामुळे किंवा अज्ञानामुळे अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह लावले जातात. काही ठिकाणी “लग्न न करता एकत्र राहणे” अशी पद्धत रूढ होताना दिसते. तथापि, अल्पवयीन मुलींचे लग्न करून त्यांच्या आयुष्याशी खेळ करण्याचे प्रकार सुरूच असल्याने समाजासमोर गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
