पक्षी चोरीप्रकरणी कर्जत पोलिसांची धडक कारवाई
अमुलकुमार जैन (रायगड) : कर्जत तालुक्यातील मौजे टेंभरे-आंबीवली येथून चोरीस गेलेल्या साडेअकरा लाख रुपयांच्या मौल्यवान विदेशी पक्ष्यांचा शोध घेऊन त्यांची सुखरूप सुटका करण्यास कर्जत पोलिसांना यश आले आहे. चेन्नई (तामिळनाडू) येथून हे पक्षी हस्तगत करण्यात आले असून दोन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
१७ जुलै २०२५ रोजी रात्री दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक १८४/२०२५ अंतर्गत ७ आफ्रिकन ग्रे पॅरट, १ ब्ल्यू-गोल्ड मकाव आणि १ स्कार्लेट मकाव असे एकूण नऊ दुर्मिळ विदेशी पक्षी चोरीस नेण्यात आले होते. या पक्ष्यांची बाजारभावातील किंमत तब्बल ११ लाख २५ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
- आफ्रिकन ग्रे पॅरट (७५ हजार रुपये प्रती पक्षी) – पाच वर्षांच्या मुलाइतकी बुद्धिमत्ता, संवादक्षम व ४० वर्षांचे आयुष्य
- ब्ल्यू-गोल्ड मकाव (२ लाख रुपये) – उत्तम शब्दसंग्रह, ६०-७० वर्षांचे आयुष्य
- स्कार्लेट मकाव (४ लाख रुपये) – आकर्षक, बोलक्या स्वभावाचा, संग्रहालयीन मागणी
या प्रकरणी अनिल रामचंद्र जाधव (१९, वावंढळ, खालापूर) व राजेशसिंग माही उर्फ समशेरसिंग (४३, महिपालपूर, दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे.
तपासाची साखळी
घटनास्थळावरील सीसीटीव्ही बंद असल्याने सुरुवातीला पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. मात्र, तपास पथकाने परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचे छायाचित्र हाती आणले. गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी अनिल जाधवला २ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडून माहिती मिळवून दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात आला. अखेर चेन्नईहून सर्व चोरी गेलेले पक्षी हस्तगत करण्यात आले. आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई रायगड पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष पथकाचे नेतृत्व कर्जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले यांनी केले. सहा. पोलीस निरीक्षक राहूल वरोटे, पो.उ.नि. किरण नवले, सुशांत वरक, समीर भोईर, स्वप्नील येरुणकर, प्रविण भालेराव, केशव नागरगोजे, विठ्ठल घावस यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
नागरिकांना आवाहन
कर्जत पोलिसांनी नागरिकांना मौल्यवान वस्तू, प्राणी व पक्ष्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. हॉटेल, फार्महाऊस किंवा व्यावसायिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे, त्यांचे DVR सुरक्षित ठेवणे आणि कॅमेरे कार्यरत आहेत का, याची वेळोवेळी खात्री करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
