तक्रारीमध्ये बांधकामातील भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांवरील अन्याय, गैरव्यवहारांसह अनेक गंभीर आरोप
रायगड । अमुलकुमार जैन
रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांच्या कार्यकाळातील कामकाजाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून खाते निहाय चौकशी होणार आहे. ही चौकशी २४ सप्टेंबर २०२५ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या कुंटे बाग येथील कार्यालयात पार पडणार असून, आरोग्य विभागाचे ठाणे येथील उपसंचालक कार्यालयाकडून आलेल्या पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती
डॉ. मनिषा विखे यांच्या विरोधात रमेश नामदेव देवरुखकर यांनी १८ जून २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे यांच्या आदेशान्वये सहाय्यक उपसंचालक (कुष्ठरोग) डॉ. मनिष रेघे यांच्या अध्यक्षतेखाली त्रीसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. समितीने चौकशी अहवाल तयार करून अभिप्रायासह वरिष्ठ कार्यालयास सादर करायचा आहे.
गंभीर आरोपांची नोंद
तक्रारीमध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यात –
- प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामातील आर्थिक भ्रष्टाचार,
- औषध खरेदीतील अनियमितता,
- कार्यालयीन कामकाजातील हलगर्जीपणा व बेकायदेशीर पत्रव्यवहार,
- हेल्थ ATM मशीनमधील गैरव्यवहार,
- कर्मचाऱ्यांवर आर्थिक अत्याचार, पगार वेळेवर न देणे,
- बदलीच्या फाइल्स रोखणे व बदली झालेल्यांना कार्यमुक्त न करणे,
- हाताखालच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसणे
अशा आरोपांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही त्यांच्या कामकाजाबाबत तक्रार केली होती.
बदलीचा वाद
डॉ. विखे यांची पूर्वी प्रशासकीय बदली करण्यात आली होती व त्यांच्या ठिकाणी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली होती. मात्र स्थगिती मिळवल्यानंतर डॉ. विखे पुन्हा जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून रुजू झाल्या. त्या काळात “एक खुर्ची दोन अधिकारी” अशी चर्चा जिल्ह्यात रंगली होती.
चौकशीची प्रक्रिया
२४ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता चौकशी पार पडणार असून, या दिवशी संबंधित अधिकारी, कर्मचारी व तक्रारीत नमूद करण्यात आलेले विषय हाताळणारे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. समितीने आवश्यक सर्व कागदपत्रे व पुरावे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
या चौकशीसाठी डॉ. ज्ञानेश्वर विसावे (मुख्य औषध निर्माण अधिकारी), एन. एम. नंदनवार (कनिष्ठ लिपिक, बदलापूर ग्रामीण रुग्णालय), प्रदिप पाटील (उपअभियंता, राष्ट्रीय आरोग्य अभियान) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या सोयीसाठी सात सीटर वाहनाची व्यवस्था करण्याचे आदेशही ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
डॉ. विखे यांची चौकशी सुरू असतानाही त्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना चौकशीपूर्वी पुरावे नष्ट करण्याची संधी मिळत आहे का, असा सवाल आरोग्य विभागातीलच अधिकारी–कर्मचाऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.
याबाबत ठाणे येथील आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. नंदापूरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क साधता आला नाही.
“आपण नियमबाह्य कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे चौकशीची भीती नाही. येणाऱ्या चौकशी समितीला आपण पूर्ण सहकार्य करू.”
-डॉ. मनिषा विखे
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. रायगड
