तांडेल बंधूंनी जादा नफ्याच्या आमिषाने शेकडो नागरिकांची आयुष्यभराची कमाई लुटली
एजंटांचाही मोठा सहभाग, पोलिस तपास वेगात
उरण । विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यातील सोनारी गावात अभिजित दयानंद तांडेल व वेदक दयानंद तांडेल या दोघा सख्ख्या भावांनी “द सीक्रेट ट्रेडिंग स्कीम”च्या माध्यमातून शेकडो नागरिकांची तब्बल ४० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणात न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही भावांसह त्यांच्यासाठी काम करणाऱ्या एजंटांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. महाराष्ट्रात आधीच विविध प्रलोभने दाखवून नागरिकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. उरण तालुक्यातीलच सतीश गावंड चिटफंड घोटाळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ठरला होता. त्यात लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्या घटनेच्या आठवणी अजूनही ताज्या असतानाच पुन्हा सोनारी गावात मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
अभिजित तांडेल व वेदक तांडेल यांनी “द सीक्रेट ट्रेडिंग स्कीम” नावाने शेअर मार्केट गुंतवणूक योजना सुरू केली. या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास आठ ते दहा टक्के परतावा मिळेल असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. जास्त नफ्याचे आमिष दाखवून त्यांनी नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची उकळ केली. अनेकांनी रोख रकमेत तर काहींनी चेक किंवा बँक व्यवहाराद्वारे लाखो-करोडो रुपये दिले. कोणी ६७ लाख, कोणी ७५ लाख तर कोणी १५ लाख अशा विविध स्वरूपात गुंतवणूक केली. शेकडो लोकांनी मिळून अंदाजे ४० कोटी रुपयांच्या आसपास रक्कम या स्कीममध्ये गुंतवली. गावागावात या स्कीमचा प्रचार करण्यासाठी तांडेल बंधूंनी स्वतःच्या विश्वासातील काही जणांना एजंट म्हणून नेमले. सन्नी महेंद्र तांडेल (सोनारी), हरेश रसाळ (चिर्ले), अभिषेक अनिल ठाकूर (जसखार), मयुरेश ठाकूर (सावरखार) यांची नावे यात समोर आली आहेत. या एजंटांनी लोकांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले व त्यातून स्वतःसाठी कमिशन घेतले. लोकांची फसवणूक करून मिळालेल्या पैशांवर त्यांनी ऐषआरामी जीवन जगल्याचेही आरोप आहेत.
काही काळ ही स्कीम सुरू राहिली. मात्र गुंतवणूकदारांनी परताव्याची मागणी केल्यानंतर तांडेल बंधूंनी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. नागरिकांना पैसे देण्याची वेळ आली की ते गाव सोडून पळ काढायचे, फोनवर संपर्क साधल्यासही ते उत्तर देत नसत. शेवटी नागरिकांमध्ये असंतोष वाढला आणि तांडेल बंधू गाव सोडून पूर्णपणे गायब झाले. आजतागायत त्यांनी गावात परतण्याची हिंमत दाखवलेली नाही. यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. आपले पैसे मिळवण्यासाठी अनेक नागरिकांनी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रारी नोंदवल्या. आतापर्यंत ९२ लाख रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारी अधिकृतरीत्या दाखल झाल्या आहेत. मात्र बदनामीच्या भीतीने अजूनही अनेक पीडित पुढे येण्यास कचरतात.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय हित संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून ते कोर्टाच्या माध्यमातून जामिनासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे. तथापि अशा प्रकारे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपींना जामीन मिळू नये आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सोनारी गावात नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याने आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास सुरु आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
-किशोर गायके,
सहाय्यक पोलीस आयुक्त, न्हावा शेवा बंदर विभाग
सोनारी गावातील आर्थिक फसवणूक संदर्भात नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनामार्फत तपास सुरु आहे. ज्यांची फसवणूक झाली त्यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे .
-दिपक सुर्वे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, न्हावा शेवा पोलीस स्टेशन
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वा नुसार तपास कार्य सुरु आहे. अभिजित तांडेल व वेदक तांडेल यांच्या विरोधात न्हावा शेवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाला असल्याने अभिजित तांडेल व वेदक तांडेल यांना कायदेशीर रित्या नोटीस पाठवली आहे. आतापर्यंत एकूण ९२ लाखाची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली आहे.कोणीही पैसे डबल करण्याचे किंवा जास्त नफा मिळवून देण्याचे कोणी आश्वासन,आमिष दाखवित असेल तर अशा गोष्टी पासून सर्वांनी लांब रहावे. अशा घटना पासून सावध रहावे कारण अशा जास्त नफेच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून पैशाच्या बाबतीत कोणतेही व्यवहार करताना नागरिकांनी व्यवहार जपून, विचार करून करावे.
-मनोज गुंड,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, न्हावा शेवा पोलीस स्टेशन
सतीश गावंड चिटफंड घोटाळ्याने हादरलेल्या उरण तालुक्यात आता तांडेल बंधूंच्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईवर पाणी फिरले आहे. अशा फसवणूक करणाऱ्या स्कीमवर लोक वारंवार विश्वास का ठेवतात हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
