रोहा/धाटाव । शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीपात्र पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. बुधवारी दुपारी अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील टँकरमधील द्रव पदार्थ नदीपात्रात सोडल्याची घटना घडली. या प्रकारानंतर आरआयए, एमआयडीसी, तसेच कोलाड पोलिसांनी तत्काळ हालचाल करत चौकशी सुरू केली. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.
घटनास्थळाची पाहणी
अशोकनगर ते पालेखुर्द या रस्त्यालगत घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेत क्षेत्रीय अधिकारी राकेश आवटी, डॉ. गजानन खडकीकर आणि कोलाड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यालगत झुडुपांवर पांढऱ्या रंगाचा थर असल्याचे त्यांना दिसले. झाडाझुडपांतून नदीपात्राच्या आतपर्यंत तपासणी केली असता, बांधकामासाठी वापरले जाणारे रेडीमेड मिक्स कॉंक्रिट (RMC) टाकण्यात आल्याचे उघड झाले.
काँक्रीटसदृश्य सामग्री टाकण्याचा प्रकार उघडकीस
अधिकाऱ्यांनी पाहणीदरम्यान लक्षात आणून दिले की, नदीपात्राजवळ यापूर्वीही काँक्रीटसदृश्य सामग्री टाकण्यात आलेली आहे. हा प्रकार सर्रास सुरू असून, नदीपात्र आणि पर्यावरण दोन्हींसाठी तो गंभीर धोक्याचा इशारा आहे. या सर्व घटनांचा सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
टँकरमुळे अपघाताचा धोका
घटनास्थळाजवळ बुधवारी टँकरमधील काही माल रस्त्यावर सांडल्याने किरकोळ अपघाताचा धोका निर्माण झाला होता. प्रत्यक्षदर्शींनी टँकर चालकाचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र चालक पसार झाला. त्यानंतर कोलाड पोलिस, एमआयडीसी अभियंता आणि आरआयए अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून टँकरचा शोध सुरू केला.
नमुने तपासणीसाठी पाठवले
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून संशयित सामग्रीचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवले आहेत. प्राथमिक पाहणीत हा माल बांधकामासाठी वापरला जाणारा RMC प्लांटमधील असल्याचे स्पष्ट झाले. मात्र नदीपात्रात किंवा रस्त्यालगत टँकर रिकामे करणे हे बेकायदेशीर असून यापुढे असे प्रदूषण खपवून घेतले जाणार नाही, असा कडक इशारा अधिकाऱ्यांनी दिला.
नोटिसा बजावणार
या घटनेच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील सर्व RMC प्लांट चालकांना नोटिसा बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे अशा प्रकारचा प्रकार घडल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विभागीय अधिकारी राकेश आवटी यांनी दिली.
नागरिकांमध्ये संताप
या प्रकारामुळे केवळ रासायनिक कारखान्यांचे टँकर नव्हे, तर आता RMC प्लांटचे टँकरही संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. परिसरातील नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून, दोषींना लवकरात लवकर बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी केली आहे. दरम्यान, हा टँकर नेमका कोणत्या प्लांटचा होता, हे लवकरच तपासातून स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिस व अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
