“खासदारांच्या विकासकामांवर टीका करण्याची लायकी कुणाचीही नाही” –शहराध्यक्ष जितेंद्र सातनाक
श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन शहरात खासदार सुनील तटकरे यांच्या विकासकामांवर अप्रत्यक्ष कोपखळी करणारा बॅनर लावण्यात आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर शाखेकडून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला असून, याबाबतचे लेखी निवेदन श्रीवर्धन पोलिस ठाण्यात सादर करण्यात आले आहे.

पक्षाची विशेष सभा
या पार्श्वभूमीवर शहरातील कुणबी भवन येथील कै. ग. स. कातकर सभागृहात पक्षाची विशेष सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष जितेंद्र सातनाक होते. सभेला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सभेत बोलताना सातनाक म्हणाले, “खासदार तटकरे यांच्यावर टीका करण्याची लायकी कुणाचीही नाही. त्यांच्या कार्यकाळात श्रीवर्धनसह संपूर्ण मतदारसंघात विकासकामांची मोठ्या प्रमाणावर उभारणी झाली आहे. या कामांमुळे अनेक नागरिक समाधानी असून, तटकरे साहेबांच्या कार्यप्रणालीमुळे शेकडो लोक राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेले आहेत.”
सोमजाई मंदिर व किनारी विकासकामे
बॅनरवर नमूद केलेल्या कामांमध्ये कुठेही भ्रष्टाचार झालेला नसल्याचे सातनाक यांनी स्पष्ट केले. “सोमजाई देवी मंदिर विकासकामाला सुरुवातीपासून काही जणांनी विरोध केला होता. भौगोलिक अडचणी, सण-उत्सवांचा व्यत्यय, तसेच ठेकेदाराच्या निधनामुळे कामात विलंब झाला. मात्र नव्या निविदा प्रक्रियेनंतर कामाला गती मिळाली आहे,” असे त्यांनी सांगितले.
समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याबाबत सातनाक म्हणाले की, तो उत्कृष्ट दर्जाचा असून पर्यटकांसाठी आकर्षणकेंद्र ठरला आहे. या कामामुळे स्थानिकांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र किनाऱ्यावर बांधलेले रॅम्प वारंवार समुद्राच्या लाटांमुळे खराब होतात, असेही त्यांनी नमूद केले.
पाणीपुरवठा व सोलर लाईट योजना
नव्या पाणी योजनेमुळे जीवना कोळीवाड्यापर्यंत पाणी पोहोचवण्यात यश आले आहे. सुरुवातीला पावसामुळे गाळ फिल्टरेशन प्लांटमध्ये शिरून पाणी गढूळ झाले होते; परंतु स्वच्छता करून योजना सुरळीत सुरू आहे. तसेच शहरात बसवलेल्या सोलर लाईट्स पाहून म्हसळा येथील नागरिकांनीदेखील त्यांच्या भागात हीच योजना राबवावी, अशी मागणी केली आहे.
रस्ते रुंदीकरण व मोबदला
रस्ते रुंदीकरणाच्या कामांवर भाष्य करताना सातनाक म्हणाले, “पर्यटन विकासासाठी रुंद रस्ते गरजेचे आहेत. मात्र बाधित सातबारा मालकांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. तसेच अनधिकृत बांधकामांवर आक्षेप घेणाऱ्यांनी आधी स्वतःची बांधकामे कायदेशीर आहेत का हे तपासावे,” असा टोला त्यांनी लगावला.
विरोधकांना जशास तसे उत्तर
सभेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सातनाक यांच्या वक्तव्याला दुजोरा देत खासदार तटकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेला ठोस प्रत्युत्तर द्यायचे ठरवले. शेवटी पक्ष संघटना अधिक बळकट करून आगामी काळात विरोधकांच्या प्रत्येक टीकेला जशास तसे उत्तर देण्याचा एकमुखी निर्णय सभेत घेण्यात आला.
