“कोणतीही सबब नको, पाणी वेळेत सोडा” – विठ्ठल मोरे यांचा प्रशासनाला इशारा
दुरुस्ती, साफसफाई वेळेत पूर्ण करून पाणी पूर्ववत -कार्यकारी अभियंता मिलिंद पवार
रोहा/धाटाव । शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील आंबेवाडी ते निवी बहुचर्चित कालव्याला यावर्षी डिसेंबर हंगामापासून सुरळीत पाणी सोडण्यात यावे, गेल्या वर्षी मे अखेर कालव्याला सोडलेलं पाणी ही केवळ तालीम होती. दुरुस्ती कामे पूर्ण न झाल्याने पाणी वेळेत सोडता आले नाही ,हे प्रशासनाचे धडधडीत अपयश होते. तरी विभागीय शेतकरी, ग्रामस्थांनी समजून घेतले. तसे आता अजिबात खपवून घेणार नाही असा गंभीर ईशारा गुरुवारी आंदोलनकर्ते बळीराजा फांऊडेशनच्या शेतकऱ्यांनी दिला. कोणतीही सबब न देता डिसेंबर हंगामापासून कालव्याला पाणी सोडण्यात यावे असे निवेदन बळीराजा फांऊडेशनने कोलाड पाटबंधारे प्रशासनाला दिले आहे.
यावेळी कालव्याच्या पाण्यासाठी बळीराजा फांऊडेशनच्या शेतकऱ्यांनी सामूहिक भूमिका व्यक्त केली. दरम्यान, कालव्याची प्रलंबीत कामे दुरुस्ती व साफसफाई वेळेत पूर्ण केली जातील, पूर्वीसारख्या हंगामी नियमाद्वारे पाणी सोडले जाईल असे स्पष्ट आश्वासन विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांनी दूरध्वनीवर बळीराजा फांऊडेशनच्या शिष्टमंडळाला दिले. तर कालव्याला हंगामी वर्षात पाणी सोडण्याच्या निवेदनाची प्रत खा. सुनील तटकरे, प्रांताधिकारी, तहसीलदार रोहा यांना पाठवण्यात आल्याची माहिती बळीराजा फांऊडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिली.
आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्याचा लढा जिल्ह्यासह सबंध राज्याला परिचीत आहे. पाण्यासाठी विभागीय शेतकऱ्यांनी अविरत लढा दिला. प्रचंड संघर्ष केला. सलग सहा-सात वर्षे आंदोलन, आमरण उपोषण, आत्मदहनाचा ईशारा, पाण्याचा जागर असे व्यापक उपक्रम सातत्यपूर्ण केले. विधिमंडळात पाणी प्रश्न उपस्थित झाला. अखेर संबंधीत विभागाने कालवा दुरुस्तीसाठी निधी देत आजगायत करोडो रुपयांची दुरुस्ती कामे मार्गी लागली. खा. सुनील तटकरेंनी लक्ष देऊन दुरुस्ती कामे जलद करण्याचे निर्देश दिले.
जवळपास ८० टक्के दुरुस्ती कामे मार्गी लागली. मे अखेर शेवटचा टप्पा निवीपर्यंत पाणी आणण्यात बळीराजा फांऊडेशनला यश आले. आता डिसेंबर हंगामीपासुन कालव्याला सुरळीतपणे पाणी सोडण्यात यावे, त्यादृष्टीने कालव्याची प्रलंबीत दुरुस्ती कामे, साफसफाई करण्यात यावी, पाणी सोडण्याला अजिबात दिरंगाई नको, कोणतीच सबब नको असे स्पष्ट निवेदन बळीराजा फांऊडेशनच्या माध्यमातून उप कार्यकारी अभियंता अतुल आगवणे यांना देण्यात आले. यावेळी बळीराजा फांऊडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप (आप्पा) देशमुख, संस्थापक राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष तुकाराम भगत, सदस्य सागर भगत, रुपेश साळवी, महेश कांबळे, शशिकांत मोरे, पत्रकार महेंद्र मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. गेल्या वर्षीही कालवा दुरुस्तीसाठी प्रशासनाला वेळ दिला. केवळ पाण्याची तालीम झाली. आता मोठी दुरुस्ती कामे झालीत. प्रलंबीत कामे, साफसफाई वेळेत करून पाणी डिसेंबर हंगामी पूर्ववत करावे, यावर आम्ही ठाम आहोत अशी भूमिका बळीराजा फांऊडेशनने मांडली. त्यावर दुरुस्ती कामे, साफसफाई वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पाणी वेळेत सोडले जाईल असे पवार यांनी बळीराजा फांऊडेशनला आश्वासीत केले.
दरम्यान, कालव्याचे पाणी सोडण्याबाबत प्रशासनाची दिरंगाई बिल्कुल खपवून घेतली जाणार नाही. यावेळी कोणतीही सबब मान्य नाही असा इशारा अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिल्याने कालव्याचा पाणी प्रश्न पुन्हा नव्याने चर्चेत आला. तर यावर्षी कालव्याला सुरळीतपणे पाणी सुरू होईल याच भावनेने संपूर्ण विभाग चांगलाच सुखावला आहे.
