हुतात्म्यांना शासकीय मानवंदना; वारसांचा सन्मान
उरण । घन:श्याम कडू/अनंत नारंगीकर
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ९४ व्या हुतात्मा स्मृती दिनाचे औचित्याने आयोजन बुधवारी (दि. २५ सप्टेंबर) चिरनेर येथे करण्यात आले. यावेळी पोलिस दलाकडून शासकीय इतमामात बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले.

१९३० चा सत्याग्रह आणि बलिदान
२५ सप्टेंबर १९३० रोजी चिरनेर येथे झालेल्या जंगल सत्याग्रहात शेतकरी, आगरी, आदिवासी अशा दोन हजारांहून अधिक आंदोलकांचा सहभाग होता. “जंगल का कायदा तोड दिया, इंग्रज भारत छोडो” अशा घोषणांनी निनादलेल्या या सत्याग्रहावर इंग्रज पोलिसांनी निर्दयी गोळीबार केला. या गोळीबारात उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यात धाकू गवत्या फोफेरकर, नवश्या महादेव कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), आलु बेमट्या म्हात्रे (दिघोडे) यांचा समावेश आहे. अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले होते.
स्वातंत्र्य संग्रामातील या लढ्याची दखल घेऊन शासनाने हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या मूळ गावी स्मारके उभारली आहेत.

शासकीय मानवंदना व अभिवादन
हुतात्मा स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दुपारी बारा वाजता पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय मानवंदना दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवर व अधिकारी वर्गाने हुतात्म्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.

वारसांचा सन्मान
कार्यक्रमात हुतात्म्यांच्या वारस व कुटुंबीयांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या स्मृती दिनाचा उद्देश पुढील पिढ्यांना स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाचे स्मरण करून देणे आणि हुतात्म्यांच्या प्रेरणेने राष्ट्रभक्तीची भावना जागवणे हा आहे.

मान्यवरांची उपस्थिती
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी सभापती नरेश घरत, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, शिंदे गटाचे रमेश म्हात्रे, अतुल भगत, माजी पं.स. सदस्य दीपक ठाकूर, सरपंच भास्कर मोकल, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उद्योगपती जे. एम. म्हात्रे, पी. पी. खारुपाटील, राजाशेठ खारपाटील, विजय शिरढोणकर, महेंद्र ठाकूर गटाचे अतुल भगत, दीपक ठाकूर, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे आदींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
