• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मंत्री भरतशेठ गोगावले यांचा मध्यरात्री मदतीचा हात! अपघातग्रस्त तरुणांना स्वतः रुग्णालयात दाखल करून वाचवला जीव

ByEditor

Oct 8, 2025

माणगाव | सलीम शेख
राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे आमदार नामदार भरतशेठ गोगावले यांनी पुन्हा एकदा आपल्या लोकाभिमुख आणि संवेदनशील नेतृत्वाचे उदाहरण घालून दिले आहे. मध्यरात्री महामार्गावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन तरुणांना त्यांनी स्वतःच्या ताफ्यातून रुग्णालयात दाखल करत मानवीतेचा आदर्श ठेवला.

बुधवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास भरतशेठ गोगावले यांचा ताफा मुंबईहून महाडकडे परत येत होता. दरम्यान, निजामपूरजवळील कांदळगाव फाटा येथे रस्त्याच्या कडेला दोन तरुण अपघातग्रस्त अवस्थेत गंभीर जखमी होऊन पडलेले दिसले. परिस्थितीची गंभीरता ओळखताच मंत्री गोगावले यांनी क्षणाचाही विलंब न लावता ताफा थांबवला आणि तातडीने त्या तरुणांना स्वतःच्या वाहनात बसवून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांनी डॉक्टरांना त्वरित उपचार सुरू करण्याच्या सूचना दिल्या आणि स्वतः रुग्णालयात थांबून संपूर्ण उपचारप्रक्रियेवर लक्ष ठेवले. अपघातग्रस्त दोन्ही तरुणांवर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांच्या स्थितीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तातडीच्या उपचारांमुळे त्यांच्या जीवितास असलेला धोका टळला.

भरतशेठ गोगावले यांनी फक्त त्यांना रुग्णालयात दाखल करून आपले कर्तव्य संपले असे मानले नाही, तर पहाटेपर्यंत रुग्णालयात राहून तरुणांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यांच्या सिटीस्कॅन रिपोर्ट्स, वैद्यकीय तपासण्या आणि पुढील उपचारांबाबत त्यांनी डॉक्टरांकडून प्रत्यक्ष माहिती घेतली. एवढेच नव्हे, तर रुग्णालयातून बाहेर पडल्यावर त्यांनी युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांना फोनवर संपर्क करून या तरुणांना आवश्यक ती सर्व मदत मिळेल याची खात्री करून घेण्याच्या सूचना दिल्या.

भरतशेठ गोगावले यांची “रात्र असो की दिवस, संकटसमयी धावून जाणारा आमदार” अशी ख्याती केवळ नावापुरती नाही. नागरिकांच्या अडचणीसाठी तात्काळ प्रतिसाद देणारे, निःस्वार्थ भावनेने कार्य करणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा आदर सर्वच स्तरावर आहे. मंत्री झाल्यानंतरही त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीत कोणताही फरक पडलेला नाही, उलट जबाबदारी वाढल्याने ते अधिक तत्परतेने कार्य करीत आहेत.

नुकत्याच झालेल्या पूरपरिस्थितीत त्यांनी पुरग्रस्त नागरिकांसाठी तत्पर मदतकार्य केले होते. इंदापूर येथे लागलेल्या आगीच्या घटनेत त्यांनी स्वतः मध्यरात्री घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम केले आणि प्रभावित दुकानदारांना आर्थिक मदतही दिली. आणि आता पुन्हा एकदा — अपघातग्रस्त तरुणांच्या मदतीसाठी मध्यरात्री धाव घेऊन त्यांनी “जनतेसाठी तत्पर नेता” ही ओळख अधिक दृढ केली आहे.

या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, माणगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार, स्वीय सहाय्यक सुशांत जगताप, भिकाजी मांढरे, शंकर शिंदे, सतीश निकम, युवासेना तालुका संपर्कप्रमुख संतोष पोळेकर, सचिन भोईर, अनुज शिंदे, स्वप्नील सावंत, श्रेयस सुर्वे, तुषार गायकवाड, तसेच माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि कर्मचारी उपस्थित होते.

मध्यरात्री घडलेल्या या प्रसंगातून भरतशेठ गोगावले यांचे जनसेवक व्यक्तिमत्त्व पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले आहे. मंत्रीपदाचा दर्जा असूनही, लोकांप्रती असलेली आत्मीयता आणि संवेदनशीलता कायम ठेवणारा नेता म्हणून त्यांनी रायगड जिल्ह्याच्या राजकारणात आपले स्वतंत्र स्थान कायम राखले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!