बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांचा गौरव, रायगड बँकेला विशेष निमंत्रण
अलिबाग | सचिन पावशे
सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या आणि देशातील अग्रगण्य सहकारी पतसंस्था म्हणून नावारूपाला आलेल्या बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम देवकिसन चांडक (भाईजी) यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने बुलढाणा अर्बनच्या चार दशकांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यात येणार असून, सहकारातून सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या कार्याचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला विशेष निमंत्रित म्हणून सन्मानपूर्वक आमंत्रण देण्यात आले आहे. बुलढाणा अर्बनचे जनरल मॅनेजर कैलास कासट आणि आयटी विभागप्रमुख शेट्टी यांनी अलिबाग येथे रायगड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांची सदिच्छा भेट घेऊन हे आमंत्रण दिले. यावेळी बुलढाणा अर्बनच्या कार्याचा संक्षिप्त परिचय देताना सहकारी क्षेत्रात संस्थेने उभ्या केलेल्या सामाजिक कार्यांचा आढावा सादर करण्यात आला.
चार दशकांची सहकारातील परिवर्तन यात्रा
१९८६ मध्ये “जनतेच्या पैशातून जनतेचे भले” या तत्त्वावर उभ्या राहिलेल्या बुलढाणा अर्बनने गेल्या ४० वर्षांत आर्थिक, तांत्रिक आणि सामाजिक क्षेत्रात क्रांतिकारी वाटचाल केली आहे. आज संस्थेचे १७ लाख सभासद, ४७६ शाखा, ७,००० हून अधिक कर्मचारी, आणि तब्बल ₹२५,००० कोटींपेक्षा अधिक व्यवसाय आहे.
कर्जवाटप, ठेवी, आणि कृषी क्षेत्रासाठी वित्तपुरवठा यामध्ये बुलढाणा अर्बनने मोठे योगदान दिले आहे. विशेषतः ४००० कोटी रुपयांचा सोनेतारण कर्ज पोर्टफोलिओ, १,६०० कोटींची वेअरहाऊस कर्जे, आणि ४३१ वेअरहाऊस प्रकल्प, यामधून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करण्यात संस्थेचे योगदान महत्वाचे ठरते.
जलसंधारणात ठसा उमटवणारे कार्य
बुलढाणा अर्बनने येलगाव धरणाचे खोदकाम करून ५० लाख घनमीटर क्षमतेची वाढ केली असून, ३०० पेक्षा अधिक फार्म पाँड्स, गॅबियन बंधारे, आणि चेकडॅम्स यांद्वारे १९०० दशलक्ष चौरस मीटर जमिनीत जलसाठा निर्माण केला आहे. हे कार्य २५ मोठ्या एक्स्काव्हेटर्स आणि १,००० ट्रॅक्टर्सच्या सहाय्याने पार पडले.
शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी
वेद विद्यालय, सहकार विद्या मंदिर, आणि ज्युनिअर कॉलेजेस यांच्याद्वारे संस्था शिक्षण क्षेत्रातही आघाडीवर आहे. २२ शाळांमध्ये २५,००० विद्यार्थी शिक्षण घेत असून, बोर्डिंग फॅसिलिटीसह ४ कोटींच्या निधीतून शाळांची उभारणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
आधुनिक बँकिंग आणि नवोन्मेष
संस्थेने कोअर बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई-वॉलेट, व्हर्च्युअल कार्ड, व्हिडिओ सर्व्हेलन्स, तसेच ‘बुलढाणा अर्बन बिझनेस नेटवर्क’ (www.bubn.in) हे स्वदेशी ई-कॉमर्स व्यासपीठ सुरू करून डिजिटल युगात नवा आदर्श घालून दिला आहे. ‘सोशल बँकिंग’ या संकल्पनेद्वारे आरोग्य, महिला सक्षमीकरण, वृद्ध कल्याण यासारख्या क्षेत्रांतही संस्थेने कार्य सुरू केले आहे.
श्रद्धास्थानांवर भक्तिनिवासांची सुविधा
शिर्डी, तिरुपती, ओंकारेश्वर, माहूर आणि नागपूर येथे उभारण्यात आलेल्या ५ भक्तिनिवासांमध्ये ७०० यात्रेकरूंसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत २ लाखांहून अधिक सभासदांनी या सुविधांचा लाभ घेतला आहे.
रायगड बँकेला विशेष निमंत्रण – सहकारातून सहकाराचा सन्मान
बुलढाणा अर्बनच्या अमृतमहोत्सवासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला विशेष निमंत्रण देणे, हे सहकारातील सहकार्याचे प्रतीक आहे. बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात, शून्य एनपीए, सततचा नफा आणि तांत्रिक प्रगती यांच्या जोरावर रायगड बँकेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांचा महाराष्ट्रातील सर्वोत्तम सीईओ पुरस्कारासाठी विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहितीही संस्थेच्या वतीने देण्यात आली.
सहकाराचा दीपस्तंभ
बुलढाणा अर्बनचा हा प्रवास केवळ आर्थिक यशाचा नाही, तर सहकारातून सामाजिक बांधिलकी, नवोन्मेष आणि परिवर्तन घडवण्याचा आहे. संस्थापक राधेश्याम चांडक यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेली ही वाटचाल आज देशभरातील सहकारी संस्थांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे. सहकारातून सहकार वाढवण्याच्या भूमिकेतून रायगड बँकेसारख्या संस्थांना गौरवून सहकारी क्षेत्रात ‘एकत्रित प्रगतीचा’ आदर्श निर्माण करण्यात आला आहे.
