कर्जत–भिवपुरीदरम्यान भीषण घटना; आरोपी प्रवासी पोलिसांच्या ताब्यात
कर्जत, दि. ७ (वार्ताहर)
धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांमधील किरकोळ वादाने चिघळत जीव घेतला. दरवाजात बसण्यावरून झालेल्या वादातून एका प्रवाशाने दुसऱ्याला लाथ मारून ट्रेनबाहेर फेकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे कर्जत–भिवपुरी स्थानकादरम्यान घडली. या घटनेत विनोद कांबळे (रा. पुणे) या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आरोपी मंगेश दसोरे (रा. अकोला) याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विनोद कांबळे हे आपल्या मित्रासह मुंबई दर्शनासाठी जात होते. दोघेही कोणार्क भुवनेश्वर एक्सप्रेसने पुण्याहून मुंबईकडे प्रवास करत होते. त्याचवेळी आरोपी मंगेश दसोरे हा देखील त्याच गाडीतून प्रवास करत होता. दरवाजात बसण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र वाद तीव्र झाल्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली.
झटापटीदरम्यान मंगेश दसोरे याने विनोद कांबळे यांना लाथ मारली. त्यामुळे कांबळे हे धावत्या ट्रेनमधून रुळावर फेकले गेले. इतर प्रवाशांनी तत्काळ चेन खेचून गाडी थांबवली आणि जखमी प्रवाशाला मदत करण्याचा प्रयत्न केला. कांबळे यांना तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच कर्जत रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासानंतर आरोपी मंगेश दसोरे याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वे पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोजच्या प्रवासात अशा किरकोळ वादांचे प्रकार घडत असले तरी, वादातून थेट जीव जाण्याची ही घटना दुर्मिळ आणि भयावह असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे.
