महाड | मिलिंद माने
महाड-पंढरपूर महामार्गावरील राजेवाडी गावाजवळ खैराची अवैध वाहतूक करणारे वाहन वनखात्याच्या कारवाईत पकडण्यात आले. या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह एक आरोपीला अटक करण्यात आली असून, सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वनखात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा राजेवाडी गावाजवळील उड्डाणपुल परिसरात वन कर्मचाऱ्यांचे पथक नियमित गस्त घालत असताना एमएच-२३ डब्ल्यू-२७७८ या बोलेरो पिकअप वाहनावर संशय आल्याने तपासणी करण्यात आली. वाहनाची पाहणी केली असता त्यात खैराचे सोलिव ९ नग (घनफूट ०.००६९) तसेच हौद्यात अंदाजे ५०० ग्रॅम खैर सालपा आढळून आली.
या प्रकरणी वाहन चालक आणि मालक संदीप उत्तम माने (रा. कारेगव्हाण, ता. बीड, जि. बीड) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६(१)(फ) व ४१/२(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
या कारवाईत सुमारे ६ लाख रुपये किंमतीचे वाहन व लाकूड जप्त करण्यात आले आहे. कारवाई उपवनसंरक्षक रोहा आणि सहाय्यक वनसंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल महाड व वनपरिक्षेत्राधिकारी आशिष पाटील यांच्या पथकाने केली.
याप्रकरणी पुढील तपास वनखात्याच्याच ताब्यात सुरू असून, या प्रकरणातून खैर तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचा तपास लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
