रीतसर घरपट्टी भरूनही दाखवली थकबाकी; नागरिकांचा संताप
श्रीवर्धन : अनिकेत मोहित
श्रीवर्धन नगरपालिकेच्या निष्काळजी आणि भोंगळ कारभारामुळे शहरातील प्रामाणिक करदात्यांना अक्षरशः त्रासाच्या गर्तेत ढकलण्यात आले आहे. नागरिकांनी रीतसर घरपट्टी भरूनही त्यांच्या नावावर मागील वर्षाची थकबाकी दाखवून पुन्हा कर आकारला जात असल्याने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर भरण्यासाठी नियमितपणे नगरपालिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना थकबाकी दाखवल्याचे नोटीस प्राप्त झाल्याने अनेकांनी थेट नगरपालिकेत धाव घेतली. मात्र, चौकशीअंती कर्मचाऱ्यांकडून “कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे ही त्रुटी झाली आहे” असे सांगण्यात आले. या कारणावर नागरिकांचा विश्वास बसत नसून, “ही चूक नव्हे, तर व्यवस्थेतील निष्काळजीपणाचे द्योतक आहे,” अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
श्रीवर्धनमधील नागरिकांनी नगरपालिकेकडे तातडीने या त्रुटीचे निराकरण करून चुकीच्या थकबाकी नोंदी रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशी स्थिती उद्भवू नये यासाठी स्थायी उपाययोजना आणि जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
एकीकडे नागरिक वेळेवर कर भरत असताना, दुसरीकडे नगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे त्यांनाच दंडात्मक स्थितीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा नगरपालिकेवरील विश्वास डळमळीत झाला असून, “सॉफ्टवेअर नव्हे, तर प्रशासनच बिघडलं आहे!” अशा शब्दांत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
