श्रीवर्धन | अनिकेत मोहित
आगामी श्रीवर्धन नगरपरिषद निवडणूक 2025 साठी आरक्षण जाहीर होताच स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे. विविध राजकीय पक्षांनी आपापल्या रणनिती आखण्यास सुरुवात केली असून, संभाव्य युती आणि आघाड्यांच्या चर्चांनाही वेग आला आहे. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी श्रीवर्धनचा राजकीय पट अधिक रंगतदार केला आहे.
मात्र या सर्व चर्चांना विराम देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे श्रीवर्धन शहर उपाध्यक्ष अजिंकेश भाटकर यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली. त्यांनी सांगितले —
“कोणत्याही पक्षासोबत युतीबाबत आमचा सध्या कोणताही विचार नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. मात्र सध्या सुरू असलेल्या युतीच्या चर्चांना आम्ही कोणताही दुजोरा देत नाही. काही निर्णय झाल्यास त्याची अधिकृत घोषणा आमच्या पक्षाकडूनच केली जाईल.”
या वक्तव्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना ऊत आला आहे. श्रीवर्धनमध्ये दोन्ही शिवसेना गट आपापली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने अनेक संभाव्य उमेदवारांनी आपापली तयारी सुरू केली असून, प्रत्येक प्रभागात मतदारांच्या समीकरणांचा आढावा घेतला जात आहे.
श्रीवर्धनमधील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, आगामी नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रोचक होणार, अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.
