• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जागतिक वारसा ‘घारापुरी’ बेट पुन्हा अंधारात!

ByEditor

Oct 14, 2025

महावितरणच्या निष्क्रिय कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त; आंदोलनाचा इशारा

उरण | घनश्याम कडू
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ ‘घारापुरी’ (एलिफंटा बेट) पुन्हा एकदा अंधारात बुडालं आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभारामुळे गेल्या काही महिन्यांपासून घारापुरी बेटावरील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून, ग्रामस्थ, व्यापारी आणि पर्यटक अक्षरशः हैराण झाले आहेत. २०२१ पासून ग्रामपंचायतीकडून वारंवार तक्रारी आणि पत्रव्यवहार होऊनही महावितरणने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांचा संताप उफाळला आहे.

घारापुरी हे जागतिक वारसा स्थळ असून, चारही बाजूंनी समुद्राने वेढलेले हे बेट २०१८ पूर्वी अंधारातच होते. त्या वर्षी समुद्रातून सबमरीन केबल टाकून अखेर बेटावर कायमस्वरूपी वीज पुरवठा सुरू करण्यात आला. पण अवघ्या सहा वर्षांतच या उजेडावर पुन्हा सावल्या दाटल्या आहेत. वीज खंडित होत असल्याने मोटार पंप बंद पडले असून, ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही करणे अशक्य झाले आहे. महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने ग्रामस्थांना नेहमीच अचानक अंधारात दिवस काढावे लागतात.

गंभीर बाब म्हणजे, घारापुरी येथे महावितरणचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी कायमस्वरूपी राहत नाही. त्यामुळे वीज खंडित झाल्यानंतर ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडे धाव घ्यावी लागते. महावितरणच्या कार्यालयातून मात्र ‘उद्या-परवा वीज येईल’ अशीच आश्वासने दिली जातात. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, “आता पुरे झालं; वीज नसेल तर आंदोलन करू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार, दोन वर्षांपूर्वी सबमरीन केबलचा काही भाग दुरुस्त करण्यात आला होता. मात्र त्यानंतरपासूनच विजेचा पुरवठा सतत खंडित होऊ लागला. या समस्येबाबत ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या पनवेल कार्यालयात अनेक वेळा प्रत्यक्ष भेटी घेऊन तक्रारी नोंदवल्या, परंतु फक्त आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात काहीही सुधारणा झाली नाही.

याहून चिंताजनक म्हणजे, न्हावा टी.एस. रहमान येथून येणाऱ्या ३३ केव्ही क्षमतेच्या वीजवाहिनीऐवजी आता केवळ २२ केव्ही केबल जोडण्यात आल्याने पुरवठा अधिकच अस्थिर झाला आहे. हा बदल कोणाच्या आदेशाने झाला, याबाबत ग्रामपंचायतीने महावितरणकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

घारापुरीचे उपसरपंच बळीराम ठाकुर आणि सरपंच मीना भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “घारापुरीला मिळालेली वीज कायमस्वरूपी राहावी, ही ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र महावितरणच्या उदासीनतेमुळे आम्हाला पुन्हा अंधारात जगावे लागत आहे. प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील.”

वीज पुरवठ्यामुळे घारापुरीचा विकास आणि पर्यटनाला चालना मिळाली होती. पाणीपुरवठा, सुरक्षायंत्रणा, व्यवसाय आणि पर्यटन यांचा पाया विजेवरच उभा आहे. पण महावितरणच्या निष्क्रियतेमुळे हा विकास पुन्हा मागे खेचला जात आहे. ग्रामस्थांचा एकच निर्धार —
“वीज नसली तरी आम्ही झुकणार नाही; आमच्या बेटाचा प्रकाश आम्ही परत मिळवणारच!”

महावितरणने त्वरित जबाबदार अधिकारी नेमून केबल दुरुस्तीची कामे हाती घेतली नाहीत, तर घारापुरी बेटावर आंदोलनाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!